Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 20 February, 2011

मोगूबाई कुर्डीकर स्मृती संगीत संमेलनाचे उद्घाटन

मडगाव, दि. १९ (प्रतिनिधी)
गोवा कलेचे माहेरघर तर महाराष्ट्र सासर आहे. गोमंतकीय सुपुत्र मास्टर दत्ताराम, नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर, गानकोकिळा लता मंगेशकर यांनी महाराष्ट्रात कलेचे प्रशिक्षण घेऊन देशाचे नाव उज्ज्वल केले. मडगाव येथील ‘स्वरमंच’ने गेल्या ४७ वर्षांत असंख्य कलाकार घडविले. या संस्थेला स्वत:ची वास्तू असावी अशी मागणी मंचच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. त्यांची ही मागणी उचित असून त्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. दवर्ली येथील भूखंड उपलब्ध झाल्यास ‘स्वरमंच’ची वास्तू लवकरच उभी राहील, असे उद्गार माजी खासदार रमाकांत आंगले यांनी काढले.
‘स्वरमंच’ मडगाव, कला व संस्कृती खाते आणि पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रवींद्र भवनात आयोजित दहाव्या गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर स्मृती संगीत संमेलनाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आंगले बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष श्रीमती सुशिला नायक, ‘स्वरमंच’चे अध्यक्ष आमदार दामोदर नाईक, आयोजन समिती अध्यक्ष रमाकांत आंगले, सचिव अनुपमा प्रभुदेसाई, कोषाध्यक्ष रंजिता पै यांची उपस्थिती होती.
यावेळी बाळकृष्ण आमोणकर, नरोत्तम पर्वतकर, (तबलापटू), विष्णूबुवा फडते (संवादिनी), एकनाथ कोसंबे (नाट्यकलाकार), सुरेंद्र बोरकर (भजनी कलाकार), माधव घांसळ (संवादिनी) व रामराव नायक (शास्त्रीय संगीत) यांचा श्री. आंगले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
मंचचे अध्यक्ष आमदार दामोदर नाईक यांनी स्वागत केले व ‘स्वरमंच’ ही गोव्यातील जुनी, संगीत शिक्षण देणारी एकमेव संस्था असल्याचे सांगितले. संगीत कलेच्या अभिवृद्धीसाठी संस्थेने परिश्रम घेतले व गेल्या ४७ वर्षांत नामवंत कलाकार निर्माण केले. संस्थेला स्वत:ची वास्तू असावी यासाठी आता प्रयत्न चालू आहेत असेही ते म्हणाले. या संमेलनाला एचडीएफसी बँक, बजाज अलायन्स यांनी सहकार्य केले असून दै. ‘गोवादूत’ माध्यम प्रयोजक असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष श्रीमती सुशिला नायक यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. त्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. अनुपमा व श्रुती यांच्या सरस्वती गीताने संमेलनाला प्रारंभ झाला.
सुरुवातीला चंद्रशेखर वझे यांचे गायन झाले. त्यांनी ‘मारवा’ राग आळविला. ‘या भवनातील गीत पुराणे’ हे गीत सादर करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले. मध्यंतरानंतर चंद्रशेखर वेर्णेकर (गोवा) यांनी ‘गोरख’ रागाने आपल्या गायनाला प्रारंभ केला. त्यानंतर रात्री १०.३० वा. देवकी पंडित यांचे गायन झाले.

No comments: