Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 24 February, 2011

मला मंत्रिपदाची इच्छाच नाही!

मिकी पाशेको यांची कोलांटी उडी
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): राज्य मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून सामूहिक राजीनामा देण्याची काल-परवापर्यंत धमकी देणारे मिकी पाशेको यांचे आज (दि.२३) दिल्लीत श्रेष्ठींबरोबर झालेल्या अंतिम चर्चेअंती अचानक परिवर्तन झाले. आपल्याला मुळी मंत्रिपदाची इच्छाच नाही, अशी भूमिका त्यांनी आज घेत थेट गोव्याचा रस्ता धरला. आपण पक्षासाठी निरपेक्ष भावनेने काम करीत राहणार असा सूरही त्यांनी आळवण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यात घडलेल्या या परिवर्तनाची रसाळ चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी आपल्या काही समर्थक प्रदेश राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांबरोबर दिल्लीत तळ ठोकून बसलेले मिकी पाशेको आज संध्याकाळी गोव्यात दाखल झाले. काल २२ रोजी झालेल्या चर्चेत मिकी पाशेको यांच्यासाठी श्रेष्ठींनी प्रसंगी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचीही तयारी दर्शवली होती, असे सांगण्यात आले होते परंतु आजच्या चर्चेअंती सरकारचा पाठिंबा काढून घेण्यावर चर्चा झाली नाहीच तर खुद्द मिकी पाशेको यांनीही मंत्रिपद मिळवण्याची आपली इच्छाही सोडून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळात मिकी पाशेको यांच्यात घडलेल्या या परिवर्तनाबाबत मात्र राजकीय गोटात चर्चा रंगली आहे. दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींकडून मिकी पाशेको यांच्या विविध कारनाम्यांची यादीच राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींना सादर करण्यात आल्याचे कॉंग्रेस गोटात बोलले जात आहे. ही ‘फाईल’ बघितल्यानंतर श्रेष्ठींकडूनच आपल्या भूमिकेत बदल करण्यात आला व मिकी पाशेको यांची समजूत काढून सध्याच्या परिस्थितीत शांत राहण्यातच भले आहे, असा सल्लाच त्यांना दिल्याचे सांगण्यात येते.
‘मला माझ्या श्रेष्ठींवर पूर्ण विश्‍वास आहे व मला गोव्यात पक्षासाठी काम करावयाचे आहे’ असे वक्तव्य करून मिकी पाशेको यांनी अखेर नमतेच घेतले आहे. राज्यात कॉंग्रेसकडून राष्ट्रवादी पक्षाला मिळत असलेली दुय्यम वागणुकीची त्यांनी तक्रार श्रेष्ठींकडे केली व याबाबतीत कॉंग्रेस श्रेष्ठींकडे चर्चा करून योग्य तो तोडगा काढू, असे त्यांना सुनावण्यात आल्याचेही कळते. दिल्लीतील या घडामोडीमुळे आता जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांच्या मंत्रिपदावर आलेले शुक्लकाष्ठ तूर्त दूर झाल्याचे सांगण्यात येते. मिकी पाशेको यांची साथ दिलेले प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी मात्र या एकूण घटनेमुळे तोंडघशीच पडले आहेत. दिल्लीहून परतलेल्या या पदाधिकार्‍यांनी आपले ‘मोबाईल’ बंद ठेवल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

No comments: