Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 20 February, 2011

नोकर्‍या वाटून मतांचा जोगवा!


साडेतीन वर्षांत ८०८१ सरकारी नोकर्‍या

२८०० नव्या पदांची अधिसूचना



पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)
सामान्य जनतेला भेडसावणार्‍या विविध प्रश्‍नांवरून राज्यात सरकारविरोधात जबरदस्त वातावरण तापत आहे. त्याचा
कोणताच परिणाम सध्या सरकारवर दिसून येत नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात नोकर भरती करून आपली ‘वोटबँक’ भक्कम करण्याची जय्यत तयारी सरकारने आरंभली आहे. याप्रकरणी प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार जानेवारी २०१० ते आत्तापर्यंत एकूण २८०० पदे घोषित करण्यात आली असून त्यांची भरती प्रक्रिया सुरू आहे.
राज्यात सरकारी नोकर भरतीसाठी मुलाखती व लेखी परीक्षा म्हणजे फार्स बनला आहे. प्रत्येक मंत्री आपल्या मर्जीनुसार भरती करीत असल्याने बेरोजगार युवकांत प्रचंड नैराश्य पसरले आहे. सध्याच्या परिस्थितीत ‘एलडीसी’ पदासाठी दोन लाख रुपये दर सुरू असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे दरम्यान, नोकर भरतीमुळे राजकीय नेत्यांना पैसा कमावण्याची आयतीच संधी प्राप्त झाली असून नोकरी दिल्याने त्याचा उपयोग मतपेढी भक्कम करण्यासाठीही होऊ लागला आहे.
मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी गेल्या विधानसभेत विचारलेल्या प्रश्‍नांवर उत्तर देताना सरकारने सादर केलेली आकडेवारी धक्कादायक ठरली आहे. जून २००७ ते आत्तापर्यंत सरकारतर्फे ५६०७ पदांची भरती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विविध खात्यांत एकूण २४७४ कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर सेवा बजावत आहेत. त्यांना नियमित करण्यासाठी किंवा कामगार कायद्याप्रमाणे इतर सुविधा मिळवून देण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. शिवाय जानेवारी २०१० ते आत्तापर्यंत विविध खात्यांत मिळून एकूण २८०० पदांची घोषणा केली असून त्यांची भरती प्रक्रिया जोरात सुरू आहे.
कंत्राट भरतीत वीज खाते आघाडीवर आहे. या खात्यात एकूण ८५९ कर्मचारी कंत्राटी सेवेत आहेत. त्यापाठोपाठ आरोग्य खाते-३७०, कारागीर प्रशिक्षण खाते-२८३, उच्च शिक्षण संचालनालय-२४७, गोवा वैद्यकीय महाविद्यालय-२२५, क्रीडा खाते-१२८ आदींचा समावेश आहे.
दरम्यान, जून २००७ पासून विविध खात्यांत केलेल्या नोकर भरतीनुसार सर्वाधिक भरती गोवा वैद्यकीय महाविद्यालयात झाली आहे. त्यात ६५९ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. पाठोपाठ पोलिस -६५४, वीज खाते -५८८, आरोग्य खाते -५४९, जलस्त्रोत्र खाते -२३५, कृषी खाते -१२५, कामगार खाते -१३१, कला व संस्कृती खाते -१०८, पंचायत -११८ आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
निवडणुकीच्या तोंडावर ही नोकरी भरती करून विरोधकांना कोंडीत पकडण्याची ही क्लुप्ती सरकारने आखल्याचे कळते. अनेक खात्यांत अर्ज स्वीकारून ठेवले आहेत. अद्याप निवड करण्यात आली नसून ती निवडणुका जवळ येताच केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंबंधी सरकारने विधानसभेत दिलेल्या माहितानुसार सर्वांत जास्त भरती पर्यटन खाते-५००, उद्योग खाते-५००, जलस्त्रोत्र खाते-३४१, खाण खाते-२३८, पोलिस-२३६, व्यापारी कर आयुक्तालय-१३८, वाहतूक-१५७, कामगार खाते-१०८ वीज खाते-१११, शिक्षण खाते-९१ आदींचा उल्लेख करता येईल. या नव्या नोकर भरतीमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडणार आहे. शिक्षण तथा इतर अनेक खात्यांत यावर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त होत असल्याने त्या जागा भरण्याची तयारी सुरू असल्याचे कळते.

No comments: