Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 21 February, 2011

केळ्यांचा व्यावसायिक ते पंच

- नोकरीवर लाथ मारणार्‍या एका अवलियाचा प्रवास
पणजी, दि. २० (शैलेश तिवरेकर): भारत हा शेतीप्रधान देश असूनही एकेकाळी शेतीला मिळणारे प्राधान्य स्वातंत्र्यानंतर झपाट्याने काळ बदलत गेल्याने शेतीव्यवसाय मागे पडत गेला. ही स्थिती जशी देशाबरोबरच गोव्यातही आहे. केळी, माड, पोफळींनी डवरलेली बागायती आणि तिला संजीवनी देणारे डोंगरातून झुळझुळ वाहणारे झरे म्हणजे या परशुरामाच्या भूमीची शान होती. म्हणूनच तर कविवर्य बा. भ. बोरकर यांनी म्हटले होते,
हिरवळ आणिक पाणी
तेथेे स्फुरतील मजला गाणी
निळींतुनी पाखरे पांढरी
किलबिलती थव्यांनी
आज मात्र गोमंतकाची परिस्थिती वेगळीच आहे. चोहोबाजूंनी नजर फिरवल्यास सगळीकडे धूळ आणि खाणी, मग कुठून येणार पाणी आणि कशी स्फुरतील गाणी? अशी स्थिती आहे. गोव्यातील शेतीव्यवसाय कमी होण्याचे हेही एक मुख्य कारण आहे. शिवाय कालानुरूप युवकांची मानसिकता बदलत गेली. आजचा युवक सरकारी नोकरीच्या मागे लागलेला दिसतो. मात्र प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच. त्यानुसार समोर येणार्‍या प्रत्येक गोष्टीवर खंबीरपणे मात करून, आहे त्या परिस्थितीत शेतीव्यवसायाला प्राधान्य देणारे सुशिक्षित युवक आजही कमी प्रमाणात का असेनात परंतु आहेत. त्यातील एक म्हणजे इब्रामपूरचे अशोक धाऊस्कर.
बालपणापासूनच स्वभाव धाडसी, देशभक्तीची ओढ असलेले अशोक शिक्षण पूर्ण करून देशासाठी आपण काही तरी करावे या उद्देशाने सीमासुरक्षा दलात भरती झाले. त्यांचे वडिलही माजी सैनिक. उतारवयातील आपल्या आईवडिलांना सोडून केवळ पैसा मिळवण्यासाठीच हजारो किलोमीटर दूर येऊन ही नोकरी करण्यापेक्षा घरी राहून आपण दुप्पट पैसा कमावू शकतो असा विचार करत अशोक हे अवघ्या दोन वर्षांच्या काळात सीमासुरक्षा दलाची नोकरी सोडून घरी परतले. घरी आल्यावर वेगवेगळे विचार मनात थैमान घालू लागले. कारण सरकारी व तीसुद्धा सैन्यातील सोडून आल्यामुळे लोक आपल्याला काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करून त्यांनी शेतीचा व्यवसाय करायचा आणि आपली धमक गावासमोर मांडायची, असे ठरवून टाकले.
मग शेतीव्यवसायात सर्वस्व ओतून सुमारे १५ वर्षार्ंपूर्वी स्वतःच्या जमिनीत केवळ २०० मंडोळी केळीची लागवड करून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर दरवर्षी किमान पाच हजार केळींची लागवड करत अशोक यांनी व्यवसाय वाढवला. केवळ केळीच नव्हे तर सुमारे २००० काजू कलमांचीही लागवड केली. अशा तर्‍हेने गेल्या १५ वर्षांपासून शेती व्यवसाय चढत्या क्रमांकावर ठेवून साळ, हेदूस या शेजारच्या गावात करारावर जमिनी घेऊन मोठ्या प्रमाणात केळींची लागवड त्यांनी केली. केळीचा व्यवसाय सुरू असतानाच दोन ट्रक (टिप्पर) खरेदी करून नव्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी केली. आपल्या व्यवसायाबरोबरच विविध क्षेत्रांतील समाजसेवेचे काम त्यांनी सुरूच ठेवले. कराटेचे प्रशिक्षणही घेतले आणि आज इब्रामपूर हणखणेचे पंच सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.
आजच्या यशाबद्दल सांगताना अशोक म्हणतात, राजकारण हे आमच्यासारख्या माणसांचे काम नव्हे. म्हणूनच समाजसेवेचे व्रत अंगीकारले व राजकारणापासून चार हात दूर राहणे आपण पसंत केले. राजकारणात सुक्याबरोबर ओलेही जळते. राजकारण हा भ्रष्टाचारी लोकांचा तलाव बनला असून आपण कितीही टाहो फोडला तरी लोक भ्रष्टाचारी म्हणूनच बोट दाखवतात. आता राजकारण नको. क्लब किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची संधी मिळते तेच चांगले. आपण करत असलेल्या चांगल्या वाईट गोष्टींचे मोजमाप समाज करत असतो. त्यामुळे समाजासाठी जगणे हेच योग्य.

No comments: