Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 25 February, 2011

मांडोप नावेलीत स्फोट

• बंद सदनिकेतील प्रकार • ५ लाखांचे नुकसान
मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी): मांडोप नावेली येथील एका बंद सदनिकेत आज पहाटे अडीचच्या सुमारास शक्तिशाली स्फोट होऊन आतील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तू खाक झाल्या. त्यामुळे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. मात्र हा स्फोट नेमका कसा झाला ते कारण उघड होऊ शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सय्यद नौशाद यांची सदर सदनिका असून ते बंगलोरमध्ये गेलेले असल्याने सध्या ती बंद आहे. पहाटे झालेल्या शक्तीशाली स्फोटाने परिसर हादरला व तेथील रहिवाशांमध्ये घबराट माजली. स्फोटानंतर तेथे आग लागली व लोकांनी अग्निशामक दलाला कळविल्यानंतर त्यांनी त्वरित दाखल होऊन ती विझविली.
आगीत टीव्ही, फर्निचर व अन्य वस्तू जळाल्या आहेत तर भिंतींना तडे गेलेले आहेत व त्यावरून स्फोटाची तीव्रता लक्षात येते. सदनिकेत गॅस सिलींडर होता पण तो सुस्थितीत असल्याने त्याची गळती होऊन त्यातून गळती होऊन स्फोट झाल्याची शक्यता नसल्याचे दलाच्या सूत्रांनी सांगितले. अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन व सहसंचालक प्रकाश परब यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पहाणी केली व तपासकामात मार्गदर्शन केले.
मडगाव पोलिसांनीही याप्रकरणी तपास सुरु केला आहे व त्यासाठी बॉंब विल्हेवाट पथक तसेच स्फोटक शोधासाठी आणलेल्या खास उपकरणाची मदत घेऊन तपासणी केली. मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार घडला तेव्हा मडगाव पोलिस स्थानकावरील उपनिरीक्षक नीलेश धायमोडकर हे तेथून जवळच असलेल्या एका मंदिराकडे गस्तीवर गेले होते व तेथे असतानाच त्यांना या स्फोटाची वर्दी मिळाली. त्यांनी त्वरित तेथे धाव घेतली व आज दिवसभर त्यांनी तेथेच थांबून तपास केला.
सदनिकेतील बैठकीच्या खोलीचीच स्फोटाने जास्त दुर्दशा झालेली आहे. स्वयंपाकघरात असलेल्या सिलींडरचा रेग्युलेटर चालू होता व त्यामुळे गॅसची गळती झाली व तो बैठकीच्या खोलीत पसरून स्फोट झाला असावा असा एक संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी असाच एक प्रकार मिरामार येथे व दुसरा रिवण येथे झाला होता. मात्र नौशाद हे बंगलोरहून परतल्यावरच याबाबत नक्की माहिती मिळेल.
मांडोप नावेली येथील हा प्रकार म्हणजे बॉंबस्फोट असल्याची भीती प्रथम व्यक्त केली जात होती पण पोलिसांनी ती फेटाळून लावलेली आहे व आजच्या तपासणीत या संशयाला पुष्टी देणारे काहीच सापडले नसल्याचे सांगितले.

No comments: