Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 20 February, 2011

४० हजार कोटींचा हसन अलीला दंड

मुंबई, दि.१९
पुण्यातील रिअल इस्टेट सल्लागार व घोड्याच्या फार्मचा मालक हसन अली खान अखेर येथील चर्चगेटस्थित आयकर विभागाच्या कार्यालयात हजर झाला. स्वित्झर्लंडची प्रमुख बँक युबीएसमध्ये आठ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढा प्रचंड काळा पैसा ठेवून करचोरी केल्याचा तसेच हवाला कारभारात सामील असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हे आरोप सिध्द झाल्यास अलीवर ४० हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

राहतवर लागला ‘फेमा’

नवी दिल्ली, दि. १९
नियमापेक्षा जास्त विदेशी चलन जवळ बाळगणारे पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आणि त्याचा व्यवस्थापक मरूफ यांच्याविरुद्ध आज ‘फेमा’ आणि जकात कायद्याचे उल्लंघन करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांचे हे प्रकरण आता निवाड्यासाठी जकात आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, राहतच्या व्हिसाची मुदत आणखी दहा दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

राष्ट्रकुल घोटाळाप्रकरणी
कलमाडींना अटक होणार

नवी दिल्ली, दि. १९
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यातील सहभागाकरिता स्पर्धा आयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना सीबीआय लवकरच अटक करण्याची शक्यता आज सूत्रांनी वर्तविली आहे. झारखंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कलमाडी व्यस्त असल्याने त्यांना पुढील आठवड्यात कोणत्याही क्षणी अटक करण्यात येण्याची शक्यता आहे.


मुशर्रफांविरोधात पुन्हा
अटक वॉरंट जारी

इस्लामाबाद, दि. १९
माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येची सुनावणी करणार्‍या पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने आज देशाचे माजी लष्करशहा जनरल परवेज मुशर्रफ यांच्याविरोधात नव्याने अटक वॉरंट जारी केला आहे.
यापूर्वी, १२ फेबु्रवारी रोजी जारी करण्यात आलेला अटक वॉरंट मुशर्रफांपर्यंत पोहोचण्यात आम्हाला यश आले नाही, अशी माहिती फेडरल तपास संस्थेने न्यायालयाला दिल्यानंतर न्या. राणा निसार अहमद खान यांनी आज नव्याने अटक वॉरंट जारी केला.


अल्पवयीन दलित मुलीवर
अमेठीत बलात्कार

अमेठी, दि. १९
उत्तर प्रदेशातील अमेठीत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर दोन युवकांनी बलात्कार केला. अमेठीच्या मुंशीगंज भागात ही घटना घडली.
ही अल्पवयीन मुलगी शुक्रवारी रात्री एका लग्न समारंभातून घरी परत येत असताना मोनू सिंग आणि संतोष या दोघांनी तिला गाठले आणि तिचे अपहरण करून तिला अज्ञात ठिकाणी नेले व तिथे तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

No comments: