Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 24 February, 2011

एका गटाकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव व आमिषे

पणजी महापालिका निवडणूक
उद्या ठरणार उमेदवारांची संख्या

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेच्या रविवार दि. १३ मार्च रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी ३० प्रभागांतून १५२ उमेदवार उभे राहिले असून दि. २५ हा अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे दि. २५ रोजी किती जण आपले अर्ज मागे घेतात यावरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. यामुळे अनेकांच्या नजरा दि. २५ रोजी मागे घेणार्‍या अर्जांकडे व मागे राहणार्‍या उमेदवारांच्या संख्येकडे लागल्या आहेत. दरम्यान, काही जणांवर दडपण आणून उमेदवारी मागे घेण्यास लावण्याचे प्रयत्न एका गटाने चालविल्याची चर्चा सुरू आहे.
पणजी महापालिकेच्या सर्व ३० प्रभागासाठी दि. १३ मार्च रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. यावेळी इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राद्वारे मतदान घेण्यात येणार असून पूर्वीच्या ३० केंद्रावरच काही ठिकाणी जादा केंद्रे सुरू करण्यात येणार असून त्यासाठी एकूण ५० मतदान यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. दि. १३ मार्च रोजी मतदान होताच त्याच दिवशी रात्री ८ वाजल्यापासून फार्मसी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या दिवशीच मतमोजणी होणे हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. दि. २२ व २३ हे दिवस उमेदवारी अर्ज छाननीचे होते. मात्र दि. २२ रोजीच सर्व अर्जांची छाननी पूर्ण झाल्याने आज दि. २३ रोजी निवडणूक अधिकारी साबाजी शेट्येे यांचे कार्यालय शांत होते.
दि. २२ रोजी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर प्रभाग २२ मध्ये दुरंगी लढत होणार
असल्याचे स्पष्ट झाले असून प्रभाग ५, १५ व २८ मध्ये प्रत्येकी तीन उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग २ व १८ मध्ये सर्वांत जास्त प्रत्येकी ८ उमेदवार आहेत.
दरम्यान, दि. २५ हा दिवस अर्ज मागे घेण्याचा असल्याने निवडणुकीत उतरलेला एक गट दबाव घालण्यात व आमिषे दाखवण्यात प्रसिद्ध असलेल्या आपल्या बलवान नेत्याच्या माध्यमातून अर्ज भरलेल्या काही अपक्ष उमेदवारांना आमिषे व धाक दाखवत आहे. त्या उमेदवारांनी अर्ज मागे घेऊन आपल्या पॅनलच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा म्हणून सदर गट प्रयत्नरत असल्याची चर्चा असून यापूर्वी सदर नेत्याने केलेल्या विविध करामती लक्षात घेता सदर चर्चेत सत्यता असल्याचे कळते.

1 comment:

Anonymous said...

What is the Goa Election Commission and Media Doing?

I am a resident of Althino. Since CCP election are due the dewelling houses in Althino have been lured by Babush by distributing LCDs, refrigerators, washing machines ect to play vote bank politics. Why is the media and election commission gone a blind eye towards these undemocratic activities. I have also heard the the same politian is going to distribute the election goodies to the Police quartes residents to lure them for votes. If some responsible person is reading my comment than please raise a voice against this and let this election be truely Democratic.