Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 26 February, 2011

ममतांचे ‘बंगाल’मयरेल्वेअंदाजपत्रक

• ऑनलाईन एसी तिकीट बुकिंग २० ऐवजी १० रुपयांत
• ५६ नवीन एक्सप्रेसतर १३ नवीन पॅसेंजर गाड्या
• गोव्यासाठी नवीन दोन रेल्वे

नवी दिल्ली, दि. २५
मागील दोन रेल्वे अंदाजपत्रकांप्रमाणेच यंदाही रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणतीही प्रवासी वा मालवाहतूक भाड्यात दरवाढ केली नाही. मात्र, दरवाढ न करण्याच्या मखमली शालजोडीखाली त्यांनी उर्वरित देशाच्या तोंडाला पाने पुसत पश्‍चिम बंगालच्या पारड्यात मात्र भरभरून गाड्या आणि प्रकल्पांचे दान टाकले. मात्र गोव्यासाठी वास्को - वालंकनी आणि पोरबंदर - कोझिकोड या दोन नवीन रेल्वे वगळता तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार झाला आहे. तसेच महाराष्ट्रातील ठाकुर्ली येथे एका वीजप्रकल्पाची योजना त्यांनी दिली. पण, प्रत्यक्षात मागील अंदाजपत्रकातील आश्‍वासने पूर्ण न करता पश्‍चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांनी तोट्यातील रेल्वेचे ‘बंगाल’मय अंदाजपत्रक आज लोकसभेत सादर केले.
दरवर्षीप्रमाणे यंदा मात्र विरोधी पक्षांनी अन्य राज्यांशी होत असलेला हा पक्षपात सहन केला नाही आणि ममतांच्या या ‘विशेष बंगाल प्रेमा’वर तीव्र आक्षेप घेत काहीवेळासाठी अंदाजपत्रकाचे भाषण त्यांनी बंद पाडले. संपुआ सरकारमधील रेल्वेमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांचे हे तिसरे अंदाजपत्रक होते. आज सकाळी अंदाजपत्रकाच्या शबनम बॅगसह त्या लोकसभेत दाखल झाल्या तेव्हा यावर्षी तोट्यातील रेल्वेचा उद्धार त्या कसा करतात, याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले होते.
पश्‍चिम बंगालला एरवीही झुकते माप देणार्‍या दीदींनी तेथील विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन यंदाचे अंदाजपत्रक तयार केल्याचे स्पष्ट दिसून आले. अपेक्षेप्रमाणेच त्यांनी पश्‍चिम बंगालबाबत अनेक नव्या योजनांची घोषणा केली. पश्‍चिम बंगालच्या सिंगूरनजीक मेट्रो कोच ङ्गक्टरी उभारली जाणार आहे. राज्यातील उलूबेरिया येथे ट्रॅक मशीन उद्योगाची स्थापना केली जाणार असून, दार्जिलिंगमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्टचे काम सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील ठाकुर्ली येथे ७०० मेगावॅट गॅसआधारित वीजप्रकल्पाची स्थापना केली जाणार असल्याचीही घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली.
यंदा सामान्यांवर कोणताही बोजा टाकणार नाही, असे ममतांनी यापूर्वीच म्हटले होते. त्यानुसार त्यांनी २०११-१२ या वर्षासाठी कोणतीही ठोस तिकीट दरवाढ सुचविलेली नाही. यापुढे रेल्वेच्या सर्व योजना पंतप्रधान रेल्वे विकास योजनेंतर्गत संचालित होणार आहेत. विशेष म्हणजे, रेल्वेमध्ये अडचणी न आणणार्‍या राज्यांना अतिरिक्त दोन रेल्वे योजना आणि दोन रेल्वेगाड्या दिल्या जाणार असल्याचीही आगळी-वेगळी घोषणा ममतादीदींनी केली.
५६ नव्या एक्सप्रेस गाड्यांसह ९ दूरान्तो आणि ३ शताब्दी एक्सप्रेसचीही घोषणा यंदाच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. याशिवाय तिकीट दरातील सवलतीसाठीची वयोमर्यादा महिलांसाठी दोन वर्षांनी कमी करण्यात आली आहे. आता ५८ वर्षांच्या महिलांनाही तिकीटदरात ज्येष्ठ नागरिकांसाठीची सूट मिळू शकणार आहे. तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात देण्यात येणारी सूट ३० टक्क्यांहून ४० टक्के करण्यात आली आहे. यापुढे कीर्ती आणि शौर्यचक्रविजेते तसेच अपंगांना राजधानी आणि शताब्दीतही सवलत मिळू शकणार आहे. एवढेच नव्हे तर अशोकचक्र आणि परमवीरचक्र विजेत्या अविवाहित शहिदांच्या माता-पित्यांना प्रवासासाठी विशेष पास दिला जाणार आहे. लष्करातील सुमारे १६ हजार माजी सैनिकांना मार्चपासून रेल्वेत सामावून घेण्याचीही घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली.

गोव्याला वाटाण्याच्या अक्षता ः आर्लेकर
वास्को, (प्रतिनिधी)
गेल्या अनेक वषार्ंपासून वास्कोतील बहुतेक नागरिकांची वास्को मिरज मार्गावर तीन ते चार रेल्वे सुरू करण्याची मागणी आहे, मात्र यंदाही ती पूर्ण झाली नाही. वास्को रेल्वे स्थानकावरून आठवड्यात फक्त एकदा वालंकनीसाठी (केरळ) रेल्वे सुरू करून केंद्र सरकारने स्थानिक जनतेच्या मागणीला वाटाण्याची अक्षता लावल्याची टीका भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने ह्या वर्षाचा अर्थसंकल्पात जाहीर केल्यानंतर वास्कोवासीयांना पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयाने मागे ठेवल्याची प्रतिक्रिया श्री. आर्लेकर यांनी दिली. मिरज रेल्वेच्या मागणीकडे दुर्लक्ष का केले असा सवाल श्री. आर्लेकर यांनी केला आहे. रेल्वे मार्ग रुंदीकरणापूर्वी (ब्रॉडगेज) वास्को रेल्वे स्थानकावरुन मीरजच्या बाजूने दिवसाला तीन ते चार रेल्वे जात होत्या मात्र आता वास्कोतून दिवसाला एकच (गोवा एक्सप्रेस) रेल्वे मिरजच्या बाजूने जात असल्याने येथील जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे श्री. आर्लेकर यांनी सांगितले. वास्कोतील जनतेची मागणी ओळखून वास्को मिरज रेल्वे सुरू करावी अशी मागणी श्री. आर्लेकर यांनी केली आहे.


गोमंतकीयांची नवीन
रेल्वेमुळे सोय ः मुख्यमंत्री
पणजी, दि. २५
वास्को रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढवून ते आदर्श केले जाईल असे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. वास्को ते वालंकणी साप्ताहिक रेल्वेमुळे तसेच पोरबंदर ते कोझिकोडे या दोन रेल्वेंमुळे गोमंतकीयांची मोठी सोय झाली आहे असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. प्रवासी आणि भाडे यात वाढ न करता महसुलात वृद्धीच्या रेल्वेमंत्र्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी यामुळे उतारुंना दिलासा मिळेल असे म्हटले आहे.

‘अर्थसंकल्प गोव्यासाठी निराशाजनक’
आज (दि.२५) केंद्राने जाहीर केलेल्या केल्वे अर्थसंकल्प हा गोव्यासाठी अतिशय निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया मडगाव सीनियर सिटीझनचे तुळशीदास मळकर्णेकर यांनी व्यक्त केली आहे.
श्री. मळकर्णेकर यांनी या अर्थसंकल्पाबाबत बोलताना पुढे सांगितले की, बंगालमध्ये येत्या काळात होणारी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र याचवेळी त्यांनी कोणत्याही प्रकारे तिकीटदरवाढ न केल्याने सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ व्यक्तींसाठी तिकीटांमध्ये ४० टक्के तर ५८ वर्षांच्या महिलांनाही आता प्रवासात सवलत केली आहेत. त्याबाबत श्री. मळकर्णेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments: