Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 24 February, 2011

‘बाई मी दगुड फोडते’ प्रथम

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत
• आठ वैयक्तिक बक्षिसे

पणजी, दि. २३ (सांस्कृतिक प्रतिनिधी): पन्नासाव्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत भार्गवी थिएटर गोवा या संस्थेने सादर केलेल्या ‘बाई मी दगुड फोडते’ या नाटकाने आठ वैयक्तिक बक्षिसांबरोबरच स्पर्धेतील १ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत नवरंग सांस्कृतिक कला मंच सांगली यांच्या व्हाईट लायर्स या नाटकासाठी रू. ५०,००० चे द्वितीय तर बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई या संस्थेच्या ‘परिमाण’ या नाटकाला रू. २५ हजाराचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट क्लब मुंबई या संस्थेच्या परिभाषा या नाटकास रू. १५,००० चे चतुर्थ व दिशा केंद्र या संस्थेच्या ‘उंच माझा झोपाळा’ या नाटकास रू. १०,००० चे पाचवे बक्षीस प्राप्त झाले.
गोवा कला अकादमीच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवून भार्गवी थिएटरच्या ‘बाई मी...’ या नाटकाने मुंबई येथे होणार्‍या अंतिम फेरीत धडक मारली होती. विष्णू सूर्या वाघ लिखित या नाटकास दिग्दर्शन ः प्रथम (जयेंद्रनाथ हळदणकर) नेपथ्य ः द्वितीय (राजा खेडेकर), प्रकाश योजना ः द्वितीय (धनंजय फाळकर), पार्श्‍वसंगीत ः तृतीय (विकास चोपडेकर), उत्कृष्ट अभिनय ः रौप्यपदक ज्योती पांचाळ, माधुरी शेटकर, तुकाराम गावस यांना तर अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र संजय मापारे यांना वैयक्तिक बक्षिसांसहित नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
दि. १७ जानेवारी ते २२ फेबु्रवारी या कालावधीत अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत विविध केंद्रावरून निवड झालेल्या एकूण १६ नाटकांनी आपले प्रयोग सादर केले होते. भार्गवी थिएटरच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments: