Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 23 January, 2011

‘हायक्विप’ कंत्राटात महाघोटाळा : दामू नाईक

ज्योकीम आलेमाव, विजय सरदेसाईंच्या अटकेची मागणी
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): सोनसोडो कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ‘मेसर्स हायक्विप प्रोजेक्ट्स प्रा. ली.’ च्या कंत्राटात सुमारे पाच कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे महालेखापालांच्या अहवालात उघड झाले आहे. याप्रकरणी गोवा राज्य नगरविकास प्राधिकरण (जीसुडा)चे अध्यक्ष नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव व तत्कालीन उपाध्यक्ष तथा प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विजय सरदेसाई यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा, अशी जोरदार मागणी भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यांनी केली.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार दामोदर नाईक यांनी ‘हायक्विप’ प्रकल्प घोटाळ्याचा पर्दाफाश केला. केंद्रात ‘कॅग’ अहवालामुळे ज्या पद्धतीने ए. राजा यांचे बिंग फुटले त्याच पद्धतीने हा घोटाळाही उघड झाला असून गोव्यातही कॉंग्रेसचे ‘मिनी राजा’ कार्यरत आहेत हे यामुळे सिद्ध होते, असा टोलाही यावेळी आमदार नाईक यांनी हाणला. हा घोटाळा लोकलेखा समितीसमोर चर्चेसाठी येणार असून त्यानंतर या बाबतीत पोलिस तक्रार करण्याचाही निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. सोनसोडो कचरा प्रकल्पावर आज राज्य सरकारला २२ कोटी रुपये खर्च करावे लागतात याला सर्वस्वी हेच नेते जबाबदार आहेत. कचरा प्रकल्पावरही आपले उखळ पांढरे करून घेण्याच्या या घाणेरड्या कृतीमुळे सरकारी तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे व त्यामुळे याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणेच योग्य ठरेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, वित्त खाते तथा दक्षता खात्याकडून आक्षेप घेण्यात आला असतानाही गैरपद्धतीने हे कंत्राट देण्यात आले. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष करार करण्यापूर्वीच सदर कंपनीला सुमारे ६८.१५ लाख आगाऊ देण्यात आले. या कंत्राटात आपला सहभाग नाही, असा आव आणून हात झटकणारे विजय सरदेसाई हेही या घोटाळ्यात गुंतले आहेत असे सांगून त्याचे कागदोपत्री पुरावेच यावेळी आमदार दामोदर नाईक यांनी सादर केले. ‘जीसुडा’ च्या विविध बैठकांच्या इतिवृत्तांताच्या प्रती तसेच ते बैठकीला हजर असल्याचे दर्शवणारी त्यांच्या सह्यांची कागदपत्रेही आमदार दामोदर नाईक यांनी सादर केली. कोणतेही लोकप्रतिनिधीपद नसताना या पदावर त्यांची नेमणूक करून नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी त्यांना चरण्यासाठी कुरणच मिळवून दिल्याचा ठपकाही श्री. नाईक यांनी ठेवला. विजय सरदेसाई यांच्याकडून सध्या मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जो अमाप पैसा खर्च केला जात आहे त्याचा स्त्रोत काय, याचा खुलासा त्यांनी करावा, असे सरळ आव्हान आमदार नाईक यांनी दिले.
दरम्यान, ‘जीसुडा’ च्या बैठकांची अनेक कागदपत्रे गहाळ झाली आहेत व त्याबाबतही गुन्हा नोंद करण्याची गरज आहे. सोनसड्यावर कुजलेल्या कचर्‍यामुळे येथील लोकांना जो त्रास सहन करावा लागतो त्याला पूर्णतः ज्योकीम व विजय सरदेसाई कारणीभूत आहेत, अशी टीका करतानाच, मुळात ‘जीसुडा’ च्या उपाध्यक्षपदी विजय सरदेसाई यांची नेमणूक नगरविकासमंत्र्यांनी कोणत्या आधारावर केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘कॅग’ अहवालामुळे हे प्रकरण लोकलेखा समितीसमोर येणार आहे. आपण या समितीचा एक सदस्य असल्याने त्याची पूर्ण चौकशी करणार असून प्रसंग आलाच तर पोलिस तक्रारही करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

No comments: