Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 24 January, 2011

खलप यांच्या कायदा आयोग अध्यक्षपद नियुक्तीला आव्हान देणार

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) - जनतेचे हित लक्षात घेऊन माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांच्या गोवा कायदा आयोगाच्या अध्यक्षपदावरील नेमणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान देणार असल्याचे ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी आज स्पष्ट केले.
रमाकांत खलप यांच्या विरोधात असलेले ३ आरोप मागे घेण्याच्या गोवा सरकारच्या राजकीय निर्णयालाही आव्हान दिले जाणार असल्याचे ऍड. रॉड्रिगीस यांनी म्हटले आहे. ज्या दिवशी ऍड. खलप यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली, त्यावेळी त्यांच्याविरोधात बँक भ्रष्टाचारासंबंधात ३ खटले प्रलंबित अवस्थेत होते, याकडेही ऍड. रॉड्रिगीस यांनी लक्ष वेधले आहे.
जाणीवपूर्वक ठकबाजी करून म्हापसा अर्बन कॉ-ऑप. बँकेला करोडो रुपयांचे नुकसान केल्याबद्दल ऍड. खलप तसेच इतरांविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० सह अनेक कलमांखाली तीन आरोपपत्रे दाखल करण्यात आली होती, हा मुद्दाही ऍड. रॉड्रिगीस यांनी निदर्शनास आणला आहे.
कायदा आयोगाचे अध्यक्ष हे कुठल्याही पक्षाशी बांधील असता कामा नये परंतु, रमाकांत खलप हे सक्रिय राजकारणी असून गोव्यातील कॉंग्रेस पक्षाचे ते प्रवक्ते असल्याची टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य वगळता देशातील सर्व कायदा आयोगाचे अध्यक्ष हे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत व आयोगाचे सदस्य हे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असल्याची माहिती त्यांनी दिली.
रमाकांत खलप यांची आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली नेमणूक ही कोणत्याही गुणवत्तेवर आधारीत नसून सर्व नियम व परंपरा धाब्यावर बसवून त्यांचे राजकीय पुनर्वसन करून त्यांना कॅबिनेट दर्जा बहाल करता यावा यासाठी करण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

No comments: