Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 25 January, 2011

‘स्वरास्त’ जनार्दन वेर्लेकर

‘भारतरत्न’ पं. भीमसेन जोशी यांचा बुलंद, घनगंभीर स्वर यापुढे भर मैङ्गलीत घुमणार नाही. जसे सुर्यकोटी समप्रभः तसेचत्यांच्या निधनाने साक्षात स्वरभास्कर मावळला आहे. मावळतीचा सूर्य नेहमीच हुरहुर लावतो. मात्र रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल लपलेला असतो. मावळतीला जाताना उद्या तुमच्यासाठी मी पुन्हा उगवेन हे आश्‍वासन देऊन तो जातो. त्याचे मावळणे ही आमच्यासाठी तात्पुरती विरहावस्था असते. पंडितजी गेले ते पुन्हा न उगवण्यासाठी. म्हणून त्यांचे स्वराकाशातून मावळणे हा साक्षात स्वरास्त आहे. जसा तानसेन पुन्हा होणे नाही तसा भीमसेन हा गायकही पुन्हा होणे नाही हे अटळ वास्तव. ते स्वीकारायला मात्र मन राजी नाही. कारण पंडितजींचे गाणे हा आमचा निखळ स्वरानंद आहे आणि राहील. आमच्या पिढीचे भाग्य थोर की असा भीमसेन ‘याचि देही याचि डोळा’ आम्ही पाहिला आणि ऐकला. त्यांची तेजस्वी गायकी सुर्यकुलाशी नाते सांगणारी. निश्‍चयाच्या बळातून आणि तपश्‍चर्येच्या अग्निदिव्यातून ती तावूनसुलाखून निघाली आणि अखिल संगीत जगताला वंदनीय ठरली. पंडितजींच्या स्वरप्रवासाचा वेध घेणे हे त्यांच्या मंतरलेल्या मैङ्गलीत चिंब भिजण्यासारखेच आनंददायी आहे.
पंडितजींचे पिताश्री गुरुराज जोशी यांनी आपल्या विश्‍व विख्यात मुलाचे चरित्र लिहिले आहे. रथसप्तमीच्या शुभदिनी काशीमुक्कामी विद्यार्जनासाठी वास्तव्य असताना त्यांना एकाएकी मंदिरातून अविरत घंटानाद ऐकू येत असल्याचा भास झाला आणि तो ऐकत असताना भीमसेन यांचा गदग येथे जन्म झाल्याची सुवार्ता त्यांच्या कानी आली. एकप्रकारे हा दैवी साक्षात्कारच असे त्यांना वाटले. बालवयापासून छोट्या भिमण्णाला संगीताच्या सुरांनी पछाडले. शाळेतून येता जाताना हॉटेलमध्ये वाजणार्‍या ध्वनिमद्रिका ऐकताना त्याची पावले रेंगाळत थबकत. तल्लीन होऊन तो ती गाणी ऐकत राही. एकदा स्वारी लग्नाच्या बरातीत बँडवादन ऐकण्यात तल्लीन झाली आणि मिरवणुकीबरोबर निघाली. किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खॉं यांच्यासारखे गाणे मला गाता आलं पाहिजे, असा बालवयातच त्याला ध्यास लागला. पिताश्रींनी मुलाचा संगीताकडे असलेला कल पाहून त्याच्यासाठी गुरु शोधला. ते मुलाला रामभाऊ कुंदगोळकर ऊर्ङ्ग सवाई गंधर्व यांच्याकडे गेले. मात्र त्यांनी भिमण्णाला शिकवायला नकार दिला. निराश न होता घरातल्या घरात मुलाच्या शिक्षणाची सोय मग पिताश्रींनी केली. काही काळ ही शिकवणी चालली. मात्र एका तिरीमिरीत छोट्या भिमण्णाने गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला आणि गुपचूप तो अमलात आणला. इथून सुरू झाली एका ध्येयवेड्या साधकाची वणवण भटकंती. पुणे, ग्वाल्हेर, दिल्ली, कोलकाता, जालंधर अशी अनिर्बंध मुशाङ्गिरी करीत मिळेल तिथे गुरुजनांकडून विद्याधन गोळा करण्याचा त्याला ध्यास लागला. पैशाअभावी विनातिकीट रेल्वे प्रवास करताना तिकिटचेकरने पकडल्यावर प्रसंगी गाणे ऐकवून त्याने आलेल्या संकटातून आपली सुटका करवून घेतली. जालंधर येथे होणार्‍या वार्षिक हरीवल्लभ संगीत समारोहात भिमण्णाची योगायागाने गाठ पडली ती पं. विनायकराव पटवर्धन यांच्याशी. त्यांनी भीमण्णाला तू इथे काय करतोस असे विचारले. ‘मला संगीत शिकायचंय’ ˆ भीमण्णाने आपले मन बुवांपाशी उघड केले. ‘मग एवढ्या दूरवर कशाला आलास?’ रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे का नाही गेलास? ते तुझ्याच गावाजवळ तर राहातात आणि बुवांचे हे शब्द पडत्या ङ्गळासारखे झेलून स्वारी स्वघरी परतली. मधल्या काळात भिमण्णा आकाशवाणीवर गायला. त्याने छोट्या मोठ्या नोकर्‍या केल्या. अनेक गुरुजनांकडून सेवाभावी वृत्तीने शिकला. संगीताच्या जोडीने व्यायाम करुन शरीर पिळदार बनवलं. स्वगृही परतलेला भिमण्णा पुन्हा एकदा पं. रामभाऊ कुंदगोळकर यांची तालीम मिळावी या एकाच महत्त्वाकांक्षेने झपाटला आणि त्याच्या सुदैवाने यावेळी मात्र रामभाऊंनी या शिष्याला गुरुगृही राहून शिकण्याची अनुज्ञा दिली. वर्ष ˆ दीड वर्ष रामभाऊंनी या मुलांची सत्त्वपरीक्षा पाहिली. त्याला ङ्गक्त कामाला जुंपून घेतलं. मोठ मोठे हंडे दूरवरून पाणी भरून आणायचे हे त्याचे काम. भिमण्णाने कोणतीही कुरकूर न करता इमाने इतबारे हे काम केले. अक्षरशः घाम गाळला आणि आपल्या गुरुची मर्जी संपादन केली. एकदाचं गुरुजींचं मन द्रवलं आणि मग भीमण्णाच्या रीतसर तालमीला सुरुवात झाली. पं. रामभाऊ कुंदगोळकर हे उस्ताद अब्दुल करीम खॉं यांचे पट्टशिष्य. किराणा घराण्याची ध्वजपताका ङ्गडकावण्याचा मान उस्तादजींचा. त्यांच्या भावपूर्ण, सुरेल गायकीचा वारसा रामभाऊंनी जोपासला आणि तो भिमण्णा, गंगुबाई हनगल, ङ्गिरोझ दस्तुर यांच्यासारख्या शिष्योत्तमांना मुक्तकंठाने शिकवला. एकदा तालमीच्यावेळी भिमण्णाचा सूर नीट लागला नाही. दुरून ऐकणार्‍या रामभाऊंनी बसल्या जागेवरुन हातातला सुपारी कातरण्याचा आडकित्ता भिमण्णाच्या दिशेने ङ्गेकला. रामभाऊंचा नेम चुकला नाही. कपाळावर तो आदळला. रक्त वाहू लागलं. पं. भीमसेन जोशी यांना नंतर आयुष्यभर या जखमेचा व्रण कपाळावर मिरवावा लागला. पुणे येथे दर वर्षी डिसेंबर महिन्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव आयोजित करण्यात येतो. पं. भीमसेन जोशी यांनी पाच दशकांहून अधिक काळ या समारोहाचे सुकाणू सांभाळले. हा जागतिक कीर्तीचा समारोह म्हणजे पंडितजींनी आपल्या गुरुंना वाहिलेली स्वरांजली. गेल्या तीन ˆ चार वर्षांचा अपवाद वगळता या समारोहाची सांगता पंडितजींच्या गाण्याने व्हायची आणि हजारो रसिक भल्या सकाळी पंडितजींच्या स्वरांच्या अमृतवर्षावात चिंब होऊनच घरोघरी परतायचे. सवाई गंधर्व समारोहाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला मी सपत्नीक हजेरी लावली होती. प्रथेप्रमाणे भल्या पहाटे पंडितजींनी आपल्या गाण्याने या समारोहाची सांगता केली. दरवर्षी अडीच ˆ तीन तास गाणारे पंडितजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या पहाटे जेमतेम पाऊण तास गायले. एकच ख्याल आणि अभंगाने सांगता केली. शेवटी गदगदलेल्या कंठाने उद्गारले ‘जमेल तशी सेवा केली आहे. गोड मानून घ्या’. पंडितजींच्या या विनम्र साधेपणाने अवघा जनसागर हेलावला. विशेष म्हणजे पंडितजींच्या या संपुर्ण गाण्याचे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन थेट प्रक्षेपण करण्यात आले.
गेली तीन ˆ चार वर्षे सवाई गंधर्व समारोहात पंडितजी गाऊ शकले नाहीत. किराणा घराण्याची दिग्गज गायिका प्रभा अत्रे या आता शेवटी गाऊन समारोहाचा समारोप करीत असतात. मात्र एकदा तरी पंडितजी सवाई गंधर्व समारोहाच्या ठिकाणी आपली अल्पकाळ उपस्थिती लावत असायचे. रंगमंचाजवळ त्यांची कार आणली जायची आणि गाडीत बसूनच ते सर्वांना अभिवादन करायचे. काहीच बोलायचे नाहीत. सरत्या वर्षी डिसेंबर महिन्यात हे संमेलन झालं; मात्र त्यांनी हा नेम चुकवला नाही. वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेलं हे छायाचित्र डोळे भरुन मी पाहिलं आणि दुधाची तहान जणू ताकावर भागवली.
पुढल्या वर्षी सवाई गंधर्व संगीत समारोह होईल तो मात्र पहिल्यांदाच पंडितजींच्या अनुपस्थितीत. ‘देव नाही देव्हार्‍यात’ असे तमाम रसिकजनांना वाटत राहील. रसिकजनांनाच कशाला त्या समारोहात सहभागी होणार्‍या सर्व लहानथोर कलाकारांना पंडितजींच्या दर्शनाला आणि आशीर्वादाला आपण मुकलो याची हळहळ वाटतचराहील. किराणा घराण्याचे बुरुज एकापाठोपाठ कोसळले त्याचे आम्ही साक्षी आहोत. पं. ङ्गिरोझ दस्तुर आणि गंगुबाई हनगल यांच्यानंतर Last of the Romans म्हणायला हवेत असे पं. भीमसेन जोशी हे किराणा घराण्याचे एकमेव मुकुटमणी होते. त्यांच्या निधनाने अखिल संगीताविश्‍वाला आपल्या तेजःपुंज गाण्याने स्वरांकित करणारा एक स्वरभोगी गायक काळाच्या पडद्याआड गेला आहे. यमन, पुरीया, शुद्ध कल्याण, मालकंस, दरबारी, ललत, तोडी हे राग अनाथ झाले आहेत. संतवाणी मूक झाली आहे.
‘जो भजे हरीको सदा’ या भजनाला आता विलक्षण एकाकी वाटत रहाणार. ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगली’ हा अभंग आळवताना तुमचं गदगदणारं शरीर, तुमची देहबोली यापुढे आम्हा अभाग्यांना कुठून दिसणार? पंडितजी, आम्हाला तुम्ही अजून हवे होता.

No comments: