Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 28 January, 2011

गोव्यातील ट्रकचालकांनी महाराष्ट्राचे ट्रक रोखले

कळणेतील खाणीवर गोव्यातील ट्रकांना आक्षेप
पेडणे, दि. २७ (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील कळणे खाणीवर गोव्यातील ट्क चालविण्यास त्या राज्यातील ट्रक व्यावसायिकांनी हरकत घेतल्याने, आज त्या राज्यातून गोव्यात येणारे खनिजवाहू ट्रक सातार्डा-न्हयबाग-पोरस्कडे पुलावर रोखण्यात आले. सातार्डा येथे एका कार्यक्रमाला आलेले महाराष्ट्राचे मंत्री नारायण राणे महामार्गावर असतानाच, आंदोलन छेडण्यात आल्याने त्यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले आहे.
श्री. राणे यांनी सध्याच्या वादावर तोडगा काढण्याची ग्वाही दिली असली तरी, महाराष्ट्रातील ट्रक व्यावसायिकांनी गोव्यातील ट्रक कळणे खाणीवर खनिजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यास जोरदार आक्षेप घेण्याचे ठरविले आहे. कोणत्याही स्थितीत गोव्यातील ट्रक कळण्यात चालवू देणार नाही, असे या ट्रक व्यावसायिकांनी आज सांगितले.त्यामुळे संघर्षाचे वातावरण आज तयार झाले.
बांदा व सातार्डा येथे महाराष्ट्रातील ट्रक व्यावसायिकांनी ट्क अडविल्याने नंतर गोव्यात येणारे तेथील ट्रक अडविण्यास सुरवात झाली. पेडण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम देसाई व महाराष्ट्राचे वाहतूक अधिकारी श्री. हावरे यांनी संबंधितांशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. योग्य तोडगा न निघाल्यास महाराष्ट्रातून पेडण्याच्या अन्य भागांत जाणारे खनिजवाहू ट्रकही रोखून धरण्याचा इशारा गोमंतकीय ट्रकचालकांनी दिला आहे.

No comments: