Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 23 January, 2011

कामत, हरिप्रसाद यांच्याकडून गृहखात्याची भलावण लांच्छनास्पद : मिकी

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): गोव्यातील युवा पिढीला विनाशाकडे नेणार्‍या ड्रग्ज व्यवहारावरून मुख्यमंत्री दिगंबर कामत व कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी ज्या पद्धतीने गृह खात्याची भलावण केली आहे तो प्रकारच मुळी लांच्छनास्पद असल्याचा जबरदस्त टोला राष्ट्रवादीचे नेते तथा बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांनी हाणला. गृहमंत्र्यांविरुद्ध पुरावे नाहीत असा आव आणणार्‍या हरिप्रसाद यांना
रवी नाईक व रॉय नाईक भाजीविक्रेते किंवा मासेविक्रेत्यांप्रमाणे बाजारात ड्रग्ज विक्री करणार, असे अभिप्रेत आहे काय, असा ठोसाही त्यांनी यावेळी लगावला.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मिकी पाशेको यांनी कॉंग्रेसचे प्रभारी हरिप्रसाद यांच्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. गोव्यातील पोलिस, ड्रग्ज व राजकारण्यांच्या साटेलोटे प्रकरणांबाबत प्रसारमाध्यमांनी रेटाच लावला आहे. या बाबतीत अनेक स्टींग ऑपरेशन्स झाली व त्यात या साट्यालोट्यांचा धडधडीत पर्दाफाशही झाला. खुद्द उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या प्रकरणी गंभीर ताशेरे ओढले आहेत. एवढे होऊनही कॉंग्रेस श्रेष्ठींना काहीच माहिती नाही, असा आव हरिप्रसाद आणीत असतील तर ते गोमंतकीय जनतेला मूर्ख समजत आहेत. ‘एनएसयूआय’ या कॉंग्रेस पक्षाच्या विद्यार्थी विभागाचे अध्यक्ष सुनील कवठणकर यांनी या बाबतीत सोनिया गांधी व राहुल गांधी यांना निवेदन सादर करून या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’मार्फत करावी, अशी मागणी केली आहे. ही निवेदने कुठे कचरा टोपलीत टाकली की काय, असा घणाघाती सवालही त्यांनी यावेळी केला. गोव्याचा सर्वनाश करू पाहणार्‍या या भ्रष्ट नेत्यांपासून या भूमीचे रक्षण करावयाचे आहे व त्यासाठी सर्वांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. ड्रग्ज प्रकरणावरून येत्या काळात राज्यात मोठे जनआंदोलन उभारले जाणार असून त्याला आपला पूर्ण पाठिंबा असेल, असेही ते म्हणाले.
नार्वेकरांना पाठिंबा
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. दयानंद नार्वेकर यांनीही उघडपणे ड्रग्ज व्यवहार तथा कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करून उघडपणे सरकारवर शरसंधान केले आहे व या आंदोलनात त्यांना आपला पूर्ण पाठिंबा असेल, अशी घोषणा मिकी पाशेको यांनी केली. येत्या विधानसभा अधिवेशनात पुन्हा एकदा या प्रकरणाच्या ‘सीबीआय’ चौकशीची मागणी होणार आहे व राष्ट्रवादीचा या मागणीला पूर्ण पाठिंबा राहील, असेही त्यांनी सांगितले. हरिप्रसाद व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडून या व्यवहाराला पाठीशी घालण्याचा हीन प्रकार होणे ही अत्यंत शरमेची गोष्ट असून ते गोव्याच्या भवितव्याकडेच खेळ मांडत असल्याची टीकाही श्री. पाशेको यांनी केली. सरकारातील आमदार तथा मंत्र्यांनी निदान आता तरी आपले तोंड उघडायला हवे; अन्यथा गोमंतकीयांना अधिक मूर्ख बनवण्याचा डाव सर्वांच्याच अंगलट येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी लिंडन मोंतेरो व केनीथ सिल्वेरा हजर होते.
सिप्रियानो मृत्युप्रकरणी प्रत्यक्षदर्शीचा गौप्यस्फोट
सिप्रियानो फर्नांडिस याला पोलिस स्थानकांत ठेवण्यात आले होते तेव्हाच त्याचा मृत्यू झाला होता हे स्पष्टपणे जाणवत होते, अशी माहिती या घटनेचे प्रत्यक्षदर्शी केनीथ सिल्वेरा यांनी दिली. सिप्रियानो याला पोलिसांकडून कोणत्या पद्धतीची वागणूक मिळाली असेल हे त्याला पाहिल्यानंतरच कळून येत होते, असेही ते म्हणाले. दरम्यान, आपण प्रत्यक्षदर्शी या नात्याने जाहीरपणे वृत्तमाध्यमांकडे माहिती दिल्याने आपल्याला धमकीचे फोन आल्याची तक्रारही सिल्वेरा यांनी पोलिसांकडे केली आहे. आपल्या विरोधातही अशाच पद्धतीची खोटी तक्रार दाखल करून पोलिस स्थानकांत बोलावण्यात आले होते व त्याचवेळी सिप्रियानो तिथे मृतावस्थेत पडला होता, असेही ते म्हणाले. सिप्रियानोच्या बाबतीत घडलेला हा प्रकार आपल्याही बाबतीत घडणार नाही कशावरून या भीतीने आपलीही पाचावर धारण बसली, असेही तो म्हणाला.

No comments: