Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 25 January, 2011

‘रॉय’चे नाव काढण्यासाठी पोलिसांकडून धमक्या

न्यायालयात तक्रार दाखल
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): ड्रग प्रकरणात सादर झालेल्या तक्रारीतील ‘रॉय’ नावाचा उल्लेख काढून टाकण्यासाठी गृहमंत्री हे गुन्हा अन्वेषण विभागातील पोलिस अधिकार्‍यांचा वापर करून तक्रारदारांना धमकावत असल्याची तक्रार न्यायालयात करण्यात आली आहे.
काशिनाथ शेट्येव डॉ. केतन गोवेकर यांनी अमली पदार्थविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांच्यासमोर ही लेखी तक्रार केली आहे. सदर तक्रार, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक मंगलदास देसाई, उपअधीक्षक शांबा सावंत व निरीक्षक सुदेश नाईक यांच्याविरुद्ध केली असून विशेष चौकशी पथकाला (‘एसआयटी’) येत्या २४ तासांत या तक्रारीची दखल घेऊन संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले जावे, अशी याचना श्री. शेटये यांनी केली आहे. ‘यात राजकीय व्यक्तीच्या मुलाचा सहभाग असल्याने पोलिस स्वतंत्रपणे याची सखोल चौकशी करू शकत नाही. त्यामुळे न्यायालयाने देखरेख ठेवून सदर प्रकरणी पंधरा दिवसांपासूनचा तपास अहवाल मागवावा,’ अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये पर्दाफाश केलेला उपनिरीक्षक आलेला सुनील गुडलर याच्यासह ‘वेणू बन्सल’ व ‘रॉय’ यांच्यावर त्वरित गुन्हा नोंद करण्याची मागणी करून काशिनाथ शेटये यांच्यासह अन्य १२ जणांनी तक्रार केली होती. यातील तक्रारदारांना धमकावण्यात आले असल्याचा दावा श्री. शेट्येे यांनी केला आहे.
न्यायालयात केलेल्या तक्रारीत म्हटल्यानुसार, १२ जानेवारी रोजी गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक सुदेश नाईक यांनी तिळामळ येथील गौतम बेने, मडगाव येथील सोनाली नाईक व प्रशांत नाईक, नावेली येथील नवीन देसाई आणि कुडचडे येथील प्रदीप काकोडकर या तक्रारदारांच्या घरी जाऊन त्यांना ‘रॉय’ याचे नाव तक्रारीतून वगळण्यासाठी धमकावण्यात आले. तक्रारदारांमध्ये एक महिलाही असून तिच्याा घरी जाताना सदर अधिकारी आपल्यासोबत महिला पोलिसांना न घेता गेला होता, असाही आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
गृहमंत्री, अधीक्षक मंगलदास देसाई, उपअधीक्षक शांबा सावंत यांच्या आदेशानंतर ‘रॉय’ हे नाव तक्रारीतून वगळले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी सुदेश नाईक नामक अधिकारी देत होता; तर हा ‘रॉय’ आपला मुलगा नसल्याचे स्पष्टीकरण रवी नाईक यांनी देऊन गोव्यात ‘रॉय’ नावाचे अनेक व्यक्त असल्याचे म्हटले आहे.
--------------------------------------------------------------
पोलिसांकडून इतरांची नावे गुलदस्त्यातच!
दरम्यान, काशिनाथ शेट्ये यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी निलंबित उपनिरीक्षक सुनील गुडलर व ‘इतरां’वर गुन्हा नोंद केला असून ‘इतर कोण’ हे मात्र सांगण्याचे धाडस पोलिस करीत नाहीत. त्या इतरांची नावे सांगण्यास टाळाटाळ करीत ‘इतर कोण, हे आम्ही अद्याप स्पष्ट केलेले नाही’ असे ‘एसआयटी’चे प्रमुख ओमप्रकाश कुडतडकर यांनी सांगून सारवासारव केली. काशिनाथ शेटये यांनी तक्रारीत केलेल्या प्रत्येक मुद्यावर चौकशी केली जाईल, असे पोलिस प्रवक्ते आत्माराम देशपांडे यांनी सांगितले. मात्र, गुडलरला अटक होणार काय, या प्रश्‍नावर ‘कोणत्याही तक्रारीत अटक करणे बंधनकारक नाही,’ असे सांगून गरज भासल्यास तपास अधिकारी अटक करू शकतात, असा खुलासा त्यांनी केला. शेट्ये यांनी आपल्या तक्रारीत केलेल्या या दोन नावांवर पोलिसांनी मौन का पाळले आहे, याचेच कोडे सर्वांना पडलेले आहे. मात्र, शेट्ये यांनी तक्रारीत नमूद केलेल्या सर्वांची नावे तक्रारीत नोंद केल्याचे ‘एसआयटी’च्या एका पोलिस अधिकार्‍याने मान्य केले. शेट्ये यांनी केलेल्या तक्रारीत श्री. बन्सल व ‘रॉय’ या दोघांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, त्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

No comments: