Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 29 January, 2011

‘वो तो अभी बच्चा है’

विश्‍वजित राणेंच्या घोषणेला नार्वेकरांचा टोला
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): म्हापसा जिल्हा इस्पितळाच्या खाजगीकरणाला आपण विरोध करतो म्हणून मलेरिया कामगारांच्या भरतीचा घोटाळा उकरून काढून दक्षता खात्यामार्फत त्याची चौकशी करण्याच्या आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या अप्रत्यक्ष धमकीला आपण अजिबात भीक घालत नाही, अशी सडेतोड प्रतिक्रिया हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर यांनी दिली. ‘वो तो अभी बच्चा है’ अशा शब्दांत ऍड. नार्वेकर यांनी विश्‍वजित यांची खिल्ली उडवली.
विश्‍वजित यांनी काल पत्रपरिषदेत बोलताना मलेरिया कामगारांच्या भरतीत घोटाळा झाला होता व त्याची चौकशी आपण दक्षता खात्यामार्फत करण्याचे आदेश आरोग्य सचिवांना देणार असल्याचे सांगितले होते. या सर्व मलेरिया कामगारांची जबानी नोंद करून घेणार असल्याचाही उल्लेख त्यांनी केला होता. हे वक्तव्य करताना विश्‍वजित यांनी
माजी आरोग्यमंत्री नार्वेकर यांच्यावरच शरसंधान केले होते.
दरम्यान, विश्‍वजित राणे यांच्या या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ऍड. नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रकरण घडले होते तेव्हा विश्‍वजित मंत्री नव्हे तर साधे आमदारही नव्हते, असे सांगितले. या सर्व मलेरिया कामगारांनी म्हापसा पोलिस स्थानकावर तत्कालीन उत्तर गोवा जिल्हा कॉंग्रेसचे खजिनदार शिरीष नाईक यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली होती. म्हापसा पोलिसांनी या कामगारांची जबानीही नोंद केली होती. शिरीष नाईक यांनी दिलेल्या जबानीत या कामगारांकडून मिळालेले पैसे कॉंग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी मार्गारेट आल्वा यांना दिल्याचे म्हटले होते. या सर्व प्रकरणास उजाळा देण्याची विश्‍वजित राणे यांना इच्छा असेल तर त्यांनी या प्रकरणाची अवश्य चौकशी करावी, असेही ऍड. नार्वेकर म्हणाले.
नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटले
दरम्यान, आज संध्याकाळी नार्वेकर यांनी आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेतली. आपल्याच सरकाराविरोधात नार्वेकर यांनी चालवलेल्या जोरदार मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या या भेटीचे अनेकांना कोडे पडले आहे. उद्या २९ जानेवारी रोजी नार्वेकर यांच्या नेतृत्वाखालील ‘गोवा डेमाक्रॅटिक फ्रंट’ ची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी नार्वेकर यांना पाचारण केले होते, अशी चर्चा सुरू होती. यासंबंधी नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता कामत यांनी भेटीसाठी आपल्याला आमंत्रित केल्याचे मान्य केले. दरम्यान,या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. तरीदेखील ही चर्चा
जनतेच्या भावनांशी निगडित होती, असे संकेत त्यांनी दिले.

No comments: