Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 23 January, 2011

कॉंग्रेसचे जनजागरण अभियान हा सर्वांत मोठा विनोद : आर्लेकर
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): देशाला विविध घोटाळे व महागाई बहाल केलेल्या कॉंग्रेसने आता आपल्या या ‘मिळकती’चे पोवाडे गाण्यासाठी ‘जनजागरण अभियान’ राबवण्याचा निर्णय घेणे हा सर्वांत मोठा विनोद आहे. तरीही या भ्रष्ट कॉंग्रेसला जन्माची अद्दल घडवण्यासाठी जनतेने या संधीचा फायदा घ्यावा व आपल्या विविध प्रश्‍नांची व समस्यांची जंत्रीच या नेत्यांसमोर ठेवावी, असे आवाहन भाजप प्रवक्ते श्री. आर्लेकर यांनी केले.
भ्रष्टाचार व लूट ही कॉंग्रेसची नीतीच असल्याने या दोन्ही गोष्टींची परिसीमा गाठलेल्या गोव्यातील आघाडी सरकारच्या कारभारावर श्रेष्ठींनी समाधानाचे प्रमाणपत्र बहाल करणे यात आश्‍चर्यकारक असे काहीच नाही. पुत्रप्रेमाने वेड्या झालेल्या धृतराष्ट्राला जसा नैतिक - अनैतिक यांच्यातील भेद समजेनासा झाला होता तसाच प्रकार कॉंग्रेसश्रेष्ठींच्या बाबतीतही झाला आहे, अशी परखड प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. कॉंग्रेस पक्षाचे प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी गोव्यातील ड्रग प्रकरणाची कोणतीही माहिती श्रेष्ठींना नाही, असे सांगून तर कमालच केली आहे. ही माहिती मुख्यमंत्र्यांनी श्रेष्ठींना द्यायची असते असेही ते म्हणतात. आता मुख्यमंत्री श्रेष्ठींना अंधारात ठेवतात की श्रेष्ठी राज्य सरकारच्या गैरकृत्यांबाबत डोळ्यांवर पट्टी बांधल्याचा आव आणतात याचा जाब जनतेनेच विचारावा, असेही श्री. आर्लेकर यांनी सुचवले. राज्यात बेकायदा खाणींचा उच्छाद सुरू आहे व अनेक ठिकाणी लोकवस्तीत या व्यवसायाने घुसखोरी चालवली आहे. अशा परिस्थितीत बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री श्रेष्ठींकडे कोणत्या तोंडाने तक्रार करणार, असा टोलाही श्री. आर्लेकर यांनी हाणला. राज्यातील प्रत्येक नेता घोटाळे व गैरकारभारात गुंतला आहे व त्यामुळे ‘एकमेका साह्य करू, अवघा लुटू गोमंतक’ यानुसारच हा कारभार सुरू आहे व श्रेष्ठींचे त्याला अभयही आहे, असा ठपकाही श्री. आर्लेकर यांनी ठेवला.
कॉंग्रेसचे कार्यकर्तेच सरकारला शिव्याशाप देतात व त्यामुळे जनतेचा सरकारावरील विश्‍वास उडेल, अशी खंत या सभेत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली, अशी बातमी काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली आहे. खुद्द आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते ज्या सरकारला शिव्या देतात त्या सरकारचा कारभार कसा चालत असेल याबाबत वेगळेपणाने सांगायची गरज नाही, अशी मल्लिनाथीही श्री. आर्लेकर यांनी केली. पोलिस कारवाईमुळे अनेकांचे हप्ते बंद झाले व त्यामुळेच आपल्यावर टीका होते, असा पवित्रा घेणार्‍या गृहमंत्र्यांनी हे हप्तेखोर नेते कोण त्याचाही पर्दाफाश केला असता तर बरे झाले असते. ड्रग प्रकरणातील ‘रॉय’ हा आपला पुत्र नव्हे असा दावा करणार्‍या गृहमंत्र्यांनी खरा ‘रॉय’ कोण हे देखील जनतेला सांगितले असते तर सोन्याहून पिवळे झाले असते, अशी फिरकीही यावेळी श्री. आर्लेकर यांनी घेतली.

No comments: