Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 23 January, 2011

धावे खाण पुन्हा सुरू करण्याचे कारस्थान

प्रकरण मुख्यमंत्र्यांवर शेकणार नगरगाववासीयांनी थोपटले दंड
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): सत्तरी तालुक्यातील नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे या गावात पुन्हा खाण सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. २००९ साली खोटा पर्यावरणीय परिणाम अहवाल सादर करून सरकारकडून खाण परवाना मिळवण्याचा डाव ग्रामस्थांनी हाणून पाडल्यानंतर आता कंपनीतर्फे नव्याने खाणीच्या नूतनीकरणाचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीला खाण खात्याचीच फुस असण्याची शक्यता वर्तवून सत्तरीवासीयांची दिशाभूल करून या खाणीसाठी परवाना देण्याचा प्रयत्न झाला तर खाणमंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत हे गोत्यात येतील, असा इशाराच येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, धावे येथील कथित खाणीसाठी खोटा पर्यावरणीय परिणाम अहवाल सादर केल्याप्रकरणी पोलिस व दक्षता खात्याकडे दाखल केलेल्या तक्रारींवर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. खोटा अहवाल सरकारला सादर केल्याचा ठपका असलेल्या कंपनीला नव्याने खाण परवाना मागण्याचा अधिकारच नाही. हा अर्ज खाण खाते दाखल करून घेते यावरून खाण खात्याचा कंपनीला वरदहस्त आहे, असा आरोप सत्तरीतील जनतेकडून होत आहे. या संपूर्ण प्रकरणात झालेला गैरव्यवहार केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाकडे पोहोचवण्यात आला आहे. राज्यातील खाण खात्याकडून सुरू असलेल्या गैरप्रकारांचा पर्दाफाशच या निमित्ताने होणार आहे. धावे येथे खाण सुरू करण्यासाठी व्हिन्सेंट फर्नांडिस यांच्या टीसी. क्रमांक -१/५८ या परवान्याबाबत सार्वजनिक सुनावणी घेतली असता यावेळी खाण कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या पर्यावरणीय परिणाम अहवालाचे वाभाडेच स्थानिकांनी अभ्यासाअंती काढले होते. या अहवालात कोणत्या पद्धतीने सत्याचा विपर्यास झाला, याचा पंचनामा ग्रामस्थांनी केला व या विरोधात पोलिस व दक्षता खात्याकडे तक्रारही दाखल केली. अखेर सरकारला ही सुनावणी रद्द करणे भाग पडले होते. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत या विषयी गौप्यस्फोट केला होता.
खोटारडेपणा करून खाण परवाना मिळवण्याचा प्रयत्न करणार्‍या खाण कंपनीला नव्याने अर्ज दाखल करण्याची मुभा देऊन सरकारने आपले खायचे दात दाखवले आहेत. या घोटाळ्यात सरकारही कंपनीला फितूर आहे, असाच संदेश पोहोचतो, अशी टिका नगरगाववासीयांनी केली आहे. वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे व सभापती प्रतापसिंग राणे यांनी धावे खाण रद्द करण्याचे आश्‍वासन दिले होते व आंदोलकांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. विद्यमान हालचाली पाहिल्यानंतर ही खाण रद्द झाली नाही हे उघड झालेच; परंतु ही खाण नव्याने सुरू करण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू असल्याचेही निष्पन्न झाले आहे. आता या नव्या घडामोडीनंतर राणे पिता-पुत्रांची नेमकी काय भूमिका असेल याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
विश्‍वजित राणे पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर अचानक सत्तरीतील खाण व्यवसायाला चालना मिळाल्याचे येथील लोकांच्या लक्षात आले आहे. सत्तरीवासीयांनी विश्‍वजित राणे यांच्या पाठीमागे राहणे पसंत केले असले तरी याचा अर्थ या जनतेचा खाण व्यवसायाला पाठिंबा आहे किंवा सत्तरीचा विनाश करण्याची मोकळीकच दिली आहे, असा समज त्यांनी करून घेऊ नये, असा इशारा येथील युवकांनी दिला आहे. सत्तरीचे रक्षण हे सत्तरीवासीयांचे आद्य कर्तव्य आहे व त्यासाठी प्रसंगी कोणत्याही थराला जाण्याची तयारी येथील युवकांनी ठेवली असून खाण व्यवसायाचे समर्थन करणार्‍या नेत्यांनी याची जाणीव ठेवावी, असाही इशारा यावेळी देण्यात आला.

No comments: