Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 28 January, 2011

चौपदरीच्या रुंदीकरणाला विरोध व बगल रस्त्यास सर्वोच्च प्राधान्यासाठी

कुडचडे, केपे, सांगेत कडकडीत ‘बंद’
कुडचडे दि. २७ (प्रतिनिधी): चौपदरी रस्त्याचे रुंदीकरण बंद करावे आणि खनिज माल वाहतुकीसाठी बगल रस्त्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे या मागणीसाठीकेपे, कुडचडे व सांगे भागात राखण जागृत मंचने आज (गुरुवारी) पुकारलेला ‘बंद’ शंभर टक्के यशस्वी ठरला. तसेच येत्या १ फेब्रुवारी रोजी सुहास सावर्डेकर यांच्या उपोषणाला सर्वमते पाठिंबा जाहीर करून त्यानंतर सचिवालयावर मोर्चा नेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
कुडचडे, सावर्डे व केपे बाजार, सांगे, कुडचडे, केपे खाजगी बससेवा, ट्रक मालक संघटनेने या बंदला पाठिंबा दिला होता. त्यामुळे हा कडकडीत बंद पाळण्यात आला. या काळात सर्व खनिजवाहू ट्रक, मोटारसायकल व रिक्षा, पेट्रोलपंप पूर्ण बंद होते. त्यापूर्वी सकाळी कांबेडकर चौक परिसरात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला सुमारे हजारभर लोक उपस्थित होते. सांग्याचे आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी सांगितले, बगल रस्त्यासंदर्भात अनेकदा आपण विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला. सरकारकडून त्याची दखलच घेण्यात आली नाही. आमच्या तोंडाला पुसण्यात आली फक्त आश्‍वासनेच.
खनिज मालाच्या वाहतुकीमुळे निर्माण होण्यार्‍या धूळ प्रदूषणाने रोज मरण्यापेक्षा उपोषण करून मरणे योग्य ठरेल. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून आपण आमरण उपोषण करणार आहोत, अशी घोषणा सामाजिक कार्यकर्ते सुहास सावर्डेकर यांनी केली. त्यावेळी उपस्थितांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन सदर उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला.
सावर्डेचे माजी सरपंच नीळकंठ नाईक म्हणाले, अनिल साळगावकर यांना जनतेने लोकसेवा व विकास साधणार असल्याच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून आमदार म्हणून निवडून दिले. मात्र निवडणुकीनंतर त्यांचे दर्शनच दुरापास्त बनले आहे.
या संपूर्ण पट्ट्याला ग्रासून राहिलेल्या खाण उद्योगासंदर्भातील या महत्त्वपूर्ण मागण्या मान्य करवून घेण्यासाठी पणजीत भव्य मोर्चा काढणे गरजेेचे आहे. त्याकरता आपणही सुहास सावर्डेकर यांच्याबरोबर उपोषणास बसणार आहोत, असे माजी नगराध्यक्ष परेश भेंडे यांनी सांगितले.
नगरसेवक प्रदीप नाईक यांनी सांगितले की, स्थानिक पालिकेने बगल रस्ता व चौपदरीकरणासाठी अनेकदा ठराव संमत केले. मात्र सरकारने एकदाही त्याची गंभीर दखल घेतली नाही.
ट्रकमालकांनी आपले सर्व ट्रक मांडवी पुलावर नेऊन सचिवालयावर मोर्चा नेण्याचे ठरवले. माजी आमदार डॉम्निक फर्नांडिस, ऍड. महेश कुडचडकर, भाजपचे रुद्रेश तेंडुलकर, डॉ. अच्युत काकोडकर, ग्राहक मंचाचे संजीव सावंत देसाई यांचीही याप्रसंगी भाषणे झाली.
जाहीर सभा झाल्यावर तेथून कुडचडे बसस्थानक, बाजार, रेल्वेस्थानक व तेथून आमदार श्याम सातार्डेकर यांच्या कार्यालयापर्यंत हातात बॅनर्स व आमदार सातार्डेकर यांच्याविरुद्ध घोेषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आमदार सातार्डेकर यांचा आगळ्या पद्धतीने निषेध करण्यात आला. नंतर सरकारी कार्यालयासमोर सभा घेऊन मोर्चाची सांगता झाली.
कुडचडे व सावर्डे भागातील औषधालये, राष्ट्रीय बँक, पोस्ट ऑफिससह सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्याशिवाय बस व इतर खाजगी वाहने, मोटारसायकल, ट्रक पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते.
केप्याचेे उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस, पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे, मामलेदार सुदिन नातू, पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर, सुदेश नार्वेकर, भानुदास देसाई, राजू राऊत देसाई तथा शीघ्र कृती दलाच्या खास तुकड्या ‘बंद’काळात उपस्थित होत्या.

No comments: