Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 25 January, 2011

जनतेत चर्चेचा विषय रखडलेली ‘ती’ फाइल आणि सरकारचे ‘मौन’

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): पोलिस, ड्रग्स माफिया व राजकारणी साटेलोटे प्रकरण ‘सीबीआय’ कडे देण्याची शिफारस खुद्द गृहमंत्री रवी नाईक यांनी १५ नोव्हेंबर २०१० रोजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे सादर केली. या शिफारशीला मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही मान्यता दिली; परंतु गेले तीन महिने ही फाइल सचिवालय पातळीवर रेंगाळत राहिल्याची खळबळजनक माहिती आता उघड झाली आहे. या ‘फाइल’ चे रेंगाळणे व त्याबाबत सरकारी पातळीवर पाळण्यात आलेले ‘मौन’ हाच आता चर्चेचा विषय बनला आहे.
राज्यातील ड्रग्स माफिया आणि पोलिस तथा राजकारण्यांशी असलेले त्यांचे कथित साटेलोटे हा विषय गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’मार्फत व्हावी यासाठी विरोधी भाजप तसेच अन्य संघटनांकडून जोरदार मागणी झाली होती. याप्रकरणावरून विधानसभा कामकाज बंद पाडण्याचे प्रकार घडल;े तसेच ‘एनएसयुआय’ या कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईपर्यंत ‘सीबीआय’ चौकशीची शिफारस केल्याची माहिती गुप्त का ठेवण्यात आली, याचे कोडे अनेकांना पडले आहे. या गोष्टीची आता वाच्यता झाल्यानंतर आज खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेल्या ‘सीबीआय’ चौकशीची मागणी सचिवालय पातळीवर नेमकी कोणत्या कारणासाठी रेंगाळली याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, या फाइलला मुख्य सचिवांनी मान्यता देऊन विशेष सचिवांकडे पाठवली. विशेष सचिवांनीही या शिफारशीला मान्यता देऊन ती पुढील प्रक्रियेसाठी अवर सचिव पातळीवर पाठवली; तरीही निव्वळ ५१ दिवस ही ‘फाईल’ सचिवालय पातळीवर रेंगाळत पडल्याचे आता उघड झाले आहे. याप्रकरणी गृह खात्यातील सूत्रांकडे चौकशी केली असता त्यांनी थेट विशेष सचिवांकडे अंगुलिनिर्देश करून त्याबाबतचे स्पष्टीकरण वरिष्ठांकडूनच घ्यावे, असे पत्रकारांना सांगितले.
एकीकडे हा विषय सचिवालय पातळीवर रेंगाळत असताना त्याबाबतची वाच्यता गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडून का झाली नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दरम्यान, १९ जानेवारी २०११ रोजी ‘सीबीआय’ चौकशीच्या प्रस्तावाला अखेर मान्यता देण्यात आली असून येत्या विधानसभा अधिवेशनात त्यासंबंधीची घोषणा करून विरोधकांची हवाच काढून घेण्याची सरकारची व्यूहरचना होती, अशीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
‘रॉय’बाबत साशंकता
या एकूण प्रकरणी ‘रॉय’ नामक व्यक्तीचा जो उल्लेख केला जात आहे ती व्यक्ती रॉय नाईक नसून वेगळीच असल्याचेही सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या अटाला व दुदू या ड्रग्स माफियांशी ‘रॉय’ नामक अनेक व्यक्ती संपर्कात होत्या,असेच चौकशीच आढळून आल्याचेही सांगण्यात येत आहे. काही ‘रॉय’ नामक व्यक्तींच्या जबान्याही पोलिसांनी नोंद करून घेतल्या असून त्यांनी ड्रग्स माफियांशी असलेल्या संबंधांची कबुली आपल्या जबानीत दिल्याचेही सांगण्यात येत आहे.

No comments: