Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 26 January, 2011

‘देशद्रोही कॉंग्रेसचे दहशतवादाला प्रोत्साहन’

तिरंगा प्रकरणी गोवा भाजपचे दणकेबाज आंदोलन
राजधानी पणजीतधरणे व निदर्शने
पंतप्रधानांच्या पुतळ्याचे दहन
कार्यकर्त्यांना जम्मूत अटक, सुटका

पणजी, दि.२५ (प्रतिनिधी): देशाची शान असलेला तिरंगा फडकावू न देणारे कॉंग्रेस व जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे देशद्रोही आहेत. कॉंग्रेस देशद्रोह्यांना आसरा देऊन देशभक्तांना तुरुंगात टाकण्याचे पाप करत असून या कृत्याबद्दल देशातील जनतेने कॉंग्रेसला शासन करायला हवे, असे सणसणीत प्रतिपादन खासदार तथा उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोशियारी यांनी आज येथे केले.
देशाच्या कानाकोपर्‍यांतून श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावयाला जाणार्‍या देशभक्त भाजप कार्यकर्त्यांना कॉंग्रेस व उमर अब्दुल्ला यांच्या सरकारने रोखून धरले आहे. त्याच्या निषेधार्थ आज पणजी कॅप्टन ऑफ पोर्टजवळ भाजपतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिकांना मार्गदर्शन करताना खा. कोशियारी बोलत होते.
ते म्हणाले, कॉंग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वत्र देशविरोधी कारवायांना ऊत आला आहे. कॉंग्रेसचा दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा प्रकार विघातक आहे. त्यामुळे देशाची सुरक्षाच धोक्यात आली आहे .
तिरंग्याला विरोध हा देशद्रोह ः श्रीपाद नाईक
खासदार श्रीपाद नाईक म्हणाले, स्वतंत्र भारतात तिरंगा फडकावता येऊ नये हे दुर्दैवी आहे. तिरंग्याला विरोध करणे म्हणजे देशद्रोहच. त्यामुळे देशद्रोही कॉंग्रेसला माफी नाहीच.
कॉंग्रेसची शंभरी भरली : पर्रीकर
तिरंगा फडकवण्यास विरोध करणार्‍या कॉंग्रेसची शंभरी भरली आहे. देशप्रेमी लोकांना आता सतर्क राहवे लागेल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले.
देशविरोधी शक्तींना बळकटी प्राप्त करून देणारे निर्णय घेणार्‍या कॉंग्रेसचा अंतःकाळ जवळ आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
प्रदेश भाजप सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर यांनी भाजप ध्वजाचे राजकारण करत नाही; उलट कॉंग्रेसनेच वेळोवेळी ध्वज, व जातीचे राजकारण करून सत्ता बळकावली असल्याचा आरोप केला.
तिरंग्यासंदर्भात पंतप्रधानांनी घेतलेली भूमिका दुर्दैवी असून त्याची किंमत कॉंग्रेसला चुकवावी लागेल, असे आमदार दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले.
संजय हरमलकर, वैदेही नाईक, आमदार फ्रान्सिस डिसोझा, विजय पै खोत, रमेश तवडकर, दामोदर नाईक तसेच राजेंद्र आर्लेकर आदींची कॉंग्रेसचा निषेध करणारी भाषणे झाली. नंतर उपस्थितांनी कॉंग्रेसच्या विरोधात तुफानी घोषणा देत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या यांच्या पुतळ्याचे दहन केले.
दरम्यान गोव्याहून काश्मीरला गेलेल्या सर्वच्या सर्व २०० कार्यकर्त्यांना आज अटक करण्यात येऊन उशिरा त्यांना सोडण्यात आले.

No comments: