Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 24 January, 2011

रॉय, बन्सल व गुडलरविरोधात गुन्हा नोंद

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) - स्टिंग ऑपरेशनमध्ये कथित ड्रगविक्री करताना दिसत असलेला उपनिरीक्षक सुनील गुडलर याच्यासह गोवा पोलिस खात्यातील माजी उपमहानिरीक्षक व सध्या अरुणाचल प्रदेश पोलिस खात्याचे उपमहानिरीक्षक वेणू बंसल, तसेच राजकीय वजन असलेला‘रॉय’ यांच्याविरुद्ध आज गुन्हा अन्वेषण विभागाने गुन्हा नोंद केला.
अमली पदार्थाची विक्री, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान या गुन्ह्याखाली वरील तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भा.दं.सं. ३८०, ४०९, १२०(ब), भ्रष्टाचार विरोधी कायदा ७, ११, १२, १३(१)सी, १४(१)ड, तसेच अमली पदार्थ विरोधी कायदा ८ (सी), २८, २९, ३०, ३१, आणि ५९(२)(ब) ही कलमे लावण्यात आली आहेत.
याविषयी काशीनाथ शेटये व अन्य १२ जणांनी काही दिवसांपूर्वी तक्रार सादर केली होती. त्यात त्यांनी गुडलर याच्यासह तक्रारीत वेणू बंसल व ‘रॉय’ या नावाचा उल्लेख करून दि. ७ जानेवारी रोजी गुन्हा अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर चालढकलपणा करणार्‍या गृहखात्याने अखेर आज या तक्रारीची दखल घेतली.
प्राथमिक चौकशी केल्यानंतर वरील संशयितांवर तक्रार नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गोवा पोलिस खात्याच्या इतिहासात पहिल्यांदाच गोवा पोलिस खात्यात सेवा बजावून बदली होऊन गेलेल्या आयपीएस अधिकार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या तिघांच्याही चौकशीतून धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. तसेच, ‘रॉय’ या व्यक्तीचाही शोध घेणे आता गुन्हा अन्वेषण विभागाला बंधनकारक होणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास राज्य सरकार खात्याने स्थापन केलेली विशेष चौकशी समिती करीत आहे.
ड्रग माफिया ‘दुदू’ याची बहीण ‘आयाला’ व त्याची प्रेयसी झरिना या दोघांनी मिळून स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यात अमली पदार्थविरोधी पथकातील उपनिरीक्षक सुनील गुडलर हा चरस विक्री करीत असल्याचा दावा आयाला व झरिना यांनी केला होता. तसेच त्यात गुडलर यांनी, आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना हप्ता द्यावा लागतो असे म्हटले होते. याची प्राथमिक चौकशी करण्याची जबाबदारी गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली होती. त्या अहवालात या स्टिंग ऑपरेशनमध्ये तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यास हिरवा कंदील देण्यात आला.
गुडलर याचा ‘रॉय’ या ‘ड्रगलॉर्ड’कडेही संबंध असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, राजकीय वजन वापरून रॉय याने गुडलर याची अमली पदार्थविरोधी पथकात बदली केली होती. तसेच आपल्या ड्रग व्यवसायाला मदत करण्यासाठी त्याची ही बदली केली होती, असा दावा तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत केला आहे. ‘रॉय’ या व्यक्तीचे राज्य सरकारातील मंत्र्याशी नाते असल्याचाही दावा करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपअधीक्षक मोहन नाईक करीत आहे.

म्हणे रॉयचा शोध घेणार!
पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला हा ‘रॉय’ कोण याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. गेले अनेक दिवस हे नाव सतत चर्चेत आहे. पोलिसांनी आज जरी गुन्हा नोंद केला असला तरी, रॉयबद्दल अधिक तपशील मात्र त्यात नाही, उलट आता गुन्हा नोंद झाल्याने या रॉयचा शोध घेण्यात येणार असल्याचे सांगून पोलिसांनी जनतेलाच बुचकळ्यात टाकले आहे.

No comments: