Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 6 March, 2010

आशिष शिरोडकरांसह पाच पोलिस निलंबित

ड्रग माफियांशी साटेलोटे भोवले; अटक होण्याचीही शक्यता
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): अमली पदार्थ विरोधी पथकात काही महिन्यांपूर्वी सेवा बजावणारे पोलिस निरीक्षक, हवालदार व अन्य तीन पोलिस शिपाई ड्रग माफियांशी साटेलोटे ठेवून ड्रग व्यवसायात गुंतले असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निरीक्षक आशिष शिरोडकर, पोलिस हवालदार हुसेन शेख, पोलिस शिपाई साईश पोकळे, संजय परब व संदीप परब ऊर्फ (कामीण) यांना निलंबित करून या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला असल्याचे कामत यांनी सांगितले. यावेळी गृहमंत्री रवी नाईक, पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक वेनू बन्सल उपस्थित होते.
अटाला या ड्रग माफियाची व्हिडिओ क्लिप इंटरनेटवर झळकल्याने वरील पोलिस संशयाच्या घेऱ्यात आले होते. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात अटक करण्यात आलेला इस्रायली ड्रग माफिया "दुदू' याच्याशीही या पोलिसांचे साटेलोटे होते व सदर पोलिस त्याला संरक्षण पुरवण्यासाठी त्याच्याकडून लाखो रुपयांची लाच घेत होते, अशी खळबळजनक माहिती तपासात उघडकीस आली होती. अटाला याने तर, सदर अधिकारी जप्त करून न्यायालयाच्या कोठडीत ठेवण्यात येत असलेलाच अमली पदार्थ आपल्याला आणून विकत असल्याचा धक्कादायक आरोप केला होता. हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप सिद्ध झाल्यास या पोलिस अधिकाऱ्यांना अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत अटक होण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
"या पोलिसांवर आरोप झाल्यानंतर त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यात आले आहेत. त्यात सदर पोलिस ड्रग माफियांशी संबंध ठेवून होते, असे प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याने त्यांना निलंबित करण्यात येत आहे' असे यावेळी श्री. कामत यांनी सांगितले. "कोणत्याही परिस्थितीत ड्रग माफियांना गोव्यात थारा न देण्याचा निर्धार गोवा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे किनारी भागांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. कायद्याने घालून दिलेल्या वेळेनंतरही शॅक किंवा रेस्टॉरंट सुरू ठेवणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल,' असे पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. पोलिसांनी ड्रग माफियांचा खातमा करण्याचा विडाच उचलला असल्याने ड्रग व्यवसायाचे अड्डे असलेल्या शॅक्स आणि अन्य ठिकाणी अचानक धाड घालून तपासणी केली जाणार आहे. शॅक्समधूनही अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्याचे श्री. बस्सी म्हणाले.
यावर्षी २० फेब्रुवारी २०१० पर्यंत अमली पदार्थ विरोधी पथकाने २१ गुन्हे नोंद केले असून सुमारे १ कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. ही मोहीम अशीच सुरू ठेवली जाणार असल्याचेही यावेळी श्री. बस्सी म्हणाले. त्याचप्रमाणे, जेरबंद असलेल्या "दुदू' याला "व्हीआयपी ट्रीटमेंट' देण्यात येत असल्याचे वृत्त सपशेल खोटे असून त्याला अशी कोणतीही सुविधा देण्यात येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मध्यवर्ती नियंत्रण कक्ष लवकरच स्थापन होणार
राज्य सरकारने केलेल्या मागणीनुसार पणजी शहरात मध्यवर्ती पोलिस नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची परवानगी मिळाली असून त्यासाठी केंद्र सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राज्यांच्या अंतर्गत सुरक्षा बैठकीच्यावेळी श्री. कामत यांनी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी केंद्राकडून पाच कोटी रुपयांचा निधीही मागितला होता. तो निधी मंजूर झाल्याचे पत्र केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांच्याकडून आल्याची माहिती श्री. कामत यांनी यावेळी दिली. या नियंत्रण कक्षासाठी ६० वाहने घेतली जाणार असून शहरांत आणि ग्रामीण भागांत गस्त घालण्यासाठी त्यांचा वापर केला जाणार आहे.
-----------------------------------------------------------------
दोघा पत्रकारांची नावेही लवकरच उजेडात
२००५ ते २००७ या काळात दोन पत्रकार ड्रग माफियांशी संबंध ठेवून होते, अशी माहिती "दुदू' याच्या चौकशीत उघड झाली असून याबद्दल पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांना विचारले असता योग्य वेळी आम्ही ती नावे घोषित करू, असे ते म्हणाले.
-----------------------------------------------------------------
'कोकेन - युरिया' प्रकरणही भोवणार
कोकेन म्हणून पकडण्यात आलेला अमली पदार्थ प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत "युरिया' खत असल्याचे सिद्ध झाल्यानेही निरीक्षक आशिष शिरोडकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या हाती याविषयी धक्कादायक माहिती लागलेली असून ती येत्या काही दिवसांत उघड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

No comments: