Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 3 March, 2010

पेट्रोल दरवाढीवरून आज संसद दणाणणार

'संपुआ' सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांची वज्रमूठ
नवी दिल्ली, दि. २ : पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीवरून भारतीय जनता पक्षासह सर्व विरोधी पक्षांनी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची संसदेत उद्या (बुधवारी) जबरदस्त कोंडी करण्याची व्यूहरचना आखली आहे. भाजपने आज नवी दिल्लीत महागाईविरोधात भव्य मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व इंद्रकुमार मल्होत्रा यांनी केले होते.
तब्बल चार दिवसांनंतर उद्या संसदेचे कामकाज सुरू होईल. आपली रणनीती पक्की करण्यासाठी सकाळी भारतीय जनता पक्षाने खास बैठकीचे आयोजन केले आहे. तशीच बैठक भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही आयोजिली आहे. इंधन दरवाढीखेरीज भारतीय जनता पक्षाने अन्नधान्याच्या वाढत्या किमतीवरूनही जोरदार आवाज उठवण्याचे ठरवले आहे.
केंद्र सरकारने या मुद्यावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे त्याचे आम्ही स्वागतच करतो; मात्र या सरकारने गरिबांची जी फसवणूक चालवली आहे त्याचे काय, असा सवाल भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केला. त्यांचा रोख प्रामुख्याने इंधन दरवाढीच्या दिशेने होता. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या दरवाढीची झळ आम आदमीला बसणार नसल्याचे सूतोवाच केले असले तरी या असल्या तर्कटांवर विश्वास ठेवण्यास भाजप अजिबात तयार नाही. शुक्रवारी केंद्रीय अंदाजपत्रक लोकसभेत सादर केले जात असताना तमाम विरोधकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे केंद्र सरकार आतून हादरले आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी वरवर जरी आपण या दरवाढीवर ठाम असल्याचे दाखवले असले तरी त्यांनाही विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे आपल्या घोषणेचा नव्याने विचार करावा लागेल, असे चित्र दिसू लागले आहे. त्यातच तृणमूल कॉंग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळहम या "संपुआ'मधीलच मित्र पक्षांनी कॉंग्रेसला घरचा आहेर दिल्यामुळे कॉंग्रेस या मुद्यावर एकाकी पडत चालली आहे. डावे पक्ष, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, तेलगू देसम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी अशा सर्वांनीच इंधन दरवाढीला कडाडून विरोध दर्शवला आहे. यातील समाजवादी पार्टी आणि राजदने "संपुआ' सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे. बिजू जनता दल आणि जयललिता यांच्या अद्रमुकलादेखील या महागाईविरोधी रणनीतीत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न प्रमुख विरोधी पक्षांनी सुरू केले आहेत. मात्र, कॉंग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी सांगितले की, लोकशाहीत मतभेद असतातच. कॉंग्रेस व मित्र पक्ष यांच्यात फूट पाडण्याचे स्वप्न जरी विरोधक पाहत असतील तरी ते कधीच यशस्वी होणार नाही. अर्थसंकल्पावरील आभारदर्शक ठरावावेळी विरोधकांनी जरी कपात प्रस्ताव आणला तरी तो संमत होणे अशक्य आहे.
तरीही सरकारमध्येच राहू : तृणमूल, द्रमुक
कोलकाता/चेन्नई : केंद्रातील "संपुआ' सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किमतीत जी वाढ केली आहे ती जनहित लक्षात घेता मागे घेण्यात यावी, अशी मागणी आम्ही केलेली असली तरी या मुद्यावर सरकारमधून बाहेर पडण्याचा आमचा विचार नाही. सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. आम्ही सरकारमध्येच राहू, असे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस पक्षाने तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक या पक्षांनी आज स्पष्ट केले आहे. आम्ही "संपुआ' सरकारमध्ये असून यापुढेही राहू, असे ममता बॅनर्जी यांनी आज कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आम्हांला कोणत्याही वादात पडावयाचे नाही. लोकशाही पद्धतीत विविध राजकीय पक्षांची विविध मते असतात; त्यामुळेच आमच्या पक्षानेही पेट्रोल व डिझेलसंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे.
तिकडे तामिळनाडूत चेन्नई येथे द्रमुकचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची मुलगी कानिमोझी यांनीही ममता बॅनर्जी यांच्यासारखेच विचार व्यक्त केले. युती सरकारमध्ये वेगवेगळी मते असू शकतात. परंतु, अशी विरोधाभासी मते व्यक्त झाली म्हणजे सरकारमध्ये फूट पडली, असा याचा अर्थ नाही. अनेक मुद्दे असे आहेत की ते आम्हांला एक ठेवतात आणि हेच महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आमदार आले बैलगाडी, सायकलवर!
हैदराबाद : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज आंध्रप्रदेशातील विरोधी पक्षाच्या आमदारांनी चक्क सायकल आणि बैलगाडीचा वापर करीत विधानसभा गाठली. तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या अनोख्या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे आमदारही सहभागी झाले होते. त्यांनी हातात आपापल्या पक्षांचा झेंडा घेतला होता. सायकल आणि बैलगाडीवर स्वार होऊन आलेल्या या आमदारांनी केंद्र सरकारला पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. सभागृहात पोहोचल्यानंतरही या आमदारांनी आपली मागणी लावून धरीत कामकाज ठप्प केले.
दुसरीकडे तिरुअनन्तपुरम् येथे भाजप आणि डाव्या पक्षांनी महागाईच्या विरोधात "बंद'चे आवाहन केले होते. या "बंद'मुळे जनजीवन प्रभावित झाले. या आंदोलनाला व्यापारी संघटना आणि व्यावसायिकांनीही पाठिंबा दिला होता.
---------------------------------------------------------------------
दरवाढीवर कॉंग्रेस ठाम
इंधन दरवाढ कमी करण्यास आज झालेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नकार देण्यात आला. "संपुआ'च्या अध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आदी नेते यावेळी उपस्थित होते. काही मंत्र्यांचा तसेच घटक पक्षांचा विरोध असला तरी ही दरवाढ अटळ असल्याचे समर्थन कॉंग्रेस पक्षाने केले आहे.

No comments: