Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 28 February, 2010

ड्रग माफियांना रोखण्यास अद्ययावत यंत्रणाच नाही

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)- गोव्यात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांची तस्करी होत असून त्यावर वचक ठेवण्यासाठी कोणतीही अद्ययावत यंत्रणा राज्य सरकारकडे नसल्याचे "डुडू' याच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. "डुडू' याच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे खुद्द पोलिसही अवाक झाले आहेत. या भयंकर व्यवसायातील धक्कादायक तपशील पोलिसांच्या हाती लागला आहे. तसेच किनारपट्टीवर अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांचीही "डुडू' यानेही सनसनाटी माहिती पोलिसांना दिली आहे. गोव्यात "ड्रग'ची तस्करी करण्यात नायजेरीयन तरुण आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात अमली पदार्थांची तस्करीच केली जात नाही, असा दावा गृहमंत्री रवी नाईक वारंवार करीत असतानाच ही सगळी माहिती उघड झाली आहे हे येथे उल्लेखनीय म्हटले पाहिजे.
याविषयी गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे अधीक्षक वेणू बन्सल यांना विचारले असता ते म्हणाले, विमानसेवा आणि रेल्वेतून अमली पदार्थाची तस्करी केली जाते. विमानतळावर आणि रेल्वे स्थानकांवर अमली पदार्थ तपासण्याची अद्ययावत यंत्रणा नाही. चार्टर्ड विमाने तेव्हा प्रवाशांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
"विद्यार्थी व्हिसा'द्वारे नायजेरियन, रशियन आणि येमेनमधील अनेक विद्यार्थी गोव्यात वावरत असून त्यातील काहींचा सहभाग अमली पदार्थांच्या तस्करीत असल्याचे आढळून आले आहे. याविषयी विचारले असता बन्सल म्हणाले, या विद्यार्थ्यांवर नजर ठेवण्याची जबाबदारी विदेश विभाग पोलिसांची आहे. हे विद्यार्थी येथे शिकण्यात येतात. त्यामुळे वर्गात त्यांची हजेरी किती असते याकडेही लक्ष देणेही गरजेचे बनले आहे.
तस्करीसाठी अनेक क्लुप्त्यांचा वापर
पोलिस यंत्रणेची नजर चुकवून अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी अनेक लुप्त्या लढवल्या जातात. पोटातून घालून अमली पदार्थ गोव्यात आणले जातात, अशी माहिती मिळाली आहे. त्यासाठी निरोधचा वापर केला जातो. अमली पदार्थ निरोधमध्ये घालून त्याला गाठ मारली जाते, नंतर तो गिळला जातो आणि नियोजित स्थळी पोहोचल्यावर शौचातून बाहेर पडणाऱ्या निरोधमधील अमली पदार्थांचा वापर विक्री किंवा नशेसाठी केला जातो. अशा पद्धतीने होणाऱ्या तस्करीवर नजर ठेवण्याची वा ती रोखण्याचे कोणतेही तंत्र अमली पदार्थविरोधी विभागाकडे नाही.

No comments: