Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 2 March, 2010

'जी सेव्हन'च्या डावपेचांमुळे प्रदेश कॉंग्रेसमध्ये तीव्र संताप

..मुख्यमंत्री फिके पडत असल्याचा ठपका
..कामत सरकारची शेंडी पवारांच्या हाती!

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारवर पूर्ण वर्चस्व प्राप्त करून आपल्या इशाऱ्यावर हे सरकार चालावे, याची व्यवस्थित मांडणी "ग्रुप ऑफ सेव्हन' अर्थात "जी-७' गटाने केली असून महाराष्ट्राप्रमाणे आता गोव्यातही कॉंग्रेसप्रणित सत्तेचा लाभ उठवून कॉंग्रेसलाच नामोहरम करण्याची व ते करताना आपले वर्चस्व वाढविण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची ही योजना असल्याचे समजते. सरकारवर आपले वर्चस्व कायम ठेवताना पुढील विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या दृष्टीनेही त्यांचा प्रवास सुरू असल्याचे खात्रीलायकरीत्या कळते. या डावपेचांमुळे मात्र प्रदेश कॉंग्रेसची कोंडी होत असून "जी - ७' गटाच्या डावपेचांबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकरही या हालचालींनी त्रस्त झाले आहेत.
कॉंग्रेसप्रणित सरकारात सत्ता भोगायची परंतु, नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मान्य करायचे. ते करताना कॉंग्रेसला सतत दबावाखाली ठेवून सरकारचे तारू आपल्या शिडानुसार पुढे हाकायचे अशी ही एकंदर योजना आहे. "जी - ७' गटाचा दबाव झुगारण्यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मंत्रिमंडळातून ढवळीकर यांचा पत्ता कापण्याची तयारी केली आणि नव्या मंत्र्याच्या रूपात कुंभारजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर यांचा शुक्रवारी शपथविधी करण्याचे जवळपास निश्चित केले तेव्हा दबावाचा प्रभाव काय असतो हे शरद पवार यांच्या माध्यमातून या गटाने दाखवून दिले. "ढवळीकर हे आमच्या गटातले आहेत आणि त्यांना हात लावण्याचा प्रयत्न कराल तर सरकार घालवून बसाल', अशी सणसणीत तंबी शरद पवार यांनी दिली काय आणि कामत यांचे उधळलेले घोडे क्षणात जमिनीवर आले काय? याचा चांगलाच अनुभव या निमित्ताने सर्वांनी घेतला. कामत यांनी यावेळी घेतलेली माघार "जी - ७' ला इतका आत्मविश्वास देऊन गेली आहे की आज मनात आणले तर विद्यमान सरकारला केव्हाही घरी बसवता येते याची स्पष्ट जाणीव त्यांना झालेली आहे. त्या अर्थाने कामत यांच्या सरकारची शेंडी खऱ्या अर्थाने "जी - ७' च्या अर्थात अर्थात शरद पवारांच्या हाती आली आहे.
खरे तर कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर व हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यास कॉंग्रेस श्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला होता. पण या दोघांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर येऊ घातलेले गंडांतर मात्र शरद पवार यांनी दिलेल्या गर्भित धमकीमुळे टळले हीच वस्तुस्थिती आहे. कॉंग्रेस श्रेष्ठींचा हिरवा कंदील गोव्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारसाठी लाल बत्ती ठरू शकेल, असे सुतोवाच पवार यांनी केल्याने ऐनवेळी शपथविधी सोहळ्याची तयारी करूनही मुख्यमंत्री कामत यांना माघार घेणे भाग पडले. मात्र मडकईकर "फियास्को'चे खापर पुन्हा मुख्यमंत्री कामत यांच्यावरच फोडले जात असल्याने सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी त्यांची स्थिती झाली आहे.
कॉंग्रेस विधिमंडळ गट व प्रदेश कार्यकारिणी यांचा मगोचे आमदार तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना तीव्र विरोध आहे. पण "जी-७' च्या मदतीने ढवळीकर यांनी आपले स्थान बळकट करून कॉंग्रेसला चांगलीच चपराक दिली आहे. विद्यमान "जी-७' गटाने नेतृत्व बदलाच्या मागणीवर ठाम राहण्याचे ठरवले असले तरी यासाठी आता त्यांनी खुद्द कॉंग्रेस आमदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दिगंबर कामत यांच्यावर शरसंधान करण्याचे ठरविले आहे. नेतृत्व बदलाचा निर्णय हा कॉंग्रेस श्रेष्ठींनी घ्यावयाचा आहे, त्यामुळे त्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही, अशी साळसूद भूमिका आता या गटाने घेतली असल्याने नेतृत्व बदलात "जी - ७' ला "इंटरेस्ट' नाही हे त्यांचे म्हणणे खोडून काढणेही मुख्यमंत्री कामत यांना शक्य नाही. त्या संदर्भात "जी - ७' वर थेट दोषारोपही करता येत नाही. काल परवापर्यंत नेतृत्व बदलावर ठाम असलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही आता या विषयावर "डिप्लोमॅटिक' विधाने करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, "जी-७' गटाच्या संपर्कात आणखीनही काही कॉंग्रेस आमदार आहेत; त्यांच्या मदतीने कामत यांचे पाय खेचण्याचेही प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते. कॉंग्रेस व भाजप यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करणे हा सुद्धा या राजकारणाचा भाग असून या नव्या योजनेचा सर्वांत जास्त फटका कॉंग्रेसला बसणार असल्याने सध्या प्रदेश कॉंग्रेसमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, या नव्या राजकीय समीकरणांमुळे कॉंग्रेसच्या भवितव्याच्या दृष्टीने दिगंबर कामत यांचे नेतृत्व फिके पडत असल्याचे कॉंग्रेसमध्ये ठाम मत बनत चालले असल्याने आता त्यांच्याकडूनही नेतृत्व बदलाची मागणी पुढे आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते.

No comments: