Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 4 March, 2010

'जी-७' च्या दादागिरीमुळे कॉंग्रेस गोटात तीव्र असंतोष

श्रेष्ठींच्या भूमिकेकडे सर्वांची नजर
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारातील कॉंग्रेसेतर "ग्रुप ऑफ सेव्हन' नेत्यांच्या वाढत्या दादागिरीमुळे कॉंग्रेस विधिमंडळ गट व प्रदेश कार्यकारिणीत प्रचंड असंतोष धुमसत असून त्याला चिंतेची किनारही लाभली आहे. या गटाची सध्याची रणनीती पाहता कॉंग्रेसबरोबर सत्तेत राहून या पक्षाला नामोहरम करण्याची त्यांची व्यूहरचना आता हळूहळू ठळक होत चालली आहे. या गटाला कशा पद्धतीने हाताळावे, असा यक्षप्रश्न कॉंग्रेससमोर उभा ठाकला असून दिल्लीतील कॉंग्रेस श्रेष्ठी याबाबत नेमकी काय भूमिका घेतात याकडेच त्यांची नजर लागून राहिलेली आहे.
आघाडी सरकारात घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, मगो, युगोडेपा व अपक्ष आमदार अशा सातही नेत्यांनी आपला वेगळा दबावगट तयार केला आहे. विशेष म्हणजे या गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आधार घेत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केले आहे, त्यामुळे कॉंग्रेसला या गटाचा दबाव सहजपणे झुगारून टाकणेही कठीण बनणार आहे. या गटाकडून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना थेट आव्हान दिले जात असल्याने कामत कॉंग्रेस पक्षाची पत कितपत सांभाळू शकतील, अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. नेतृत्व बदलाच्या मागणीवरून या गटाने यापूर्वीच कॉंग्रेस पक्षातील काही आमदारांना आपल्या बाजूने वळवल्याने या गटाला उघडपणे थोपवणेही कामत यांना शक्य होणार नाही. आपली खुर्ची सांभाळण्यासाठी आता मुकाट्याने या गटाची दादागिरी सहन करावी की कॉंग्रेसची प्रतिष्ठा जपावी, अशा द्विधा मनःस्थितीत मुख्यमंत्री कामत सापडले आहेत.
प्रदेश कॉंग्रेस पातळीवर या गटाविरोधात प्रचंड असंतोष पसरला असला तरी सत्ता शाबूत ठेवण्याच्या दृष्टीने या गटाविरोधात उघडपणे मतप्रदर्शन करण्याचे धाडस कुणीही पदाधिकारी करत नसल्याने पक्षातील अस्वस्थता वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता कायम राखणे गरजेचे आहे व त्यासाठी काही प्रमाणात मानहानी सहन करणे अपरिहार्य आहे, असे मत एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्या मवाळ भूमिकेवरही पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज असल्याचीही वार्ता पसरली आहे. राज्यातील कॉंग्रेसचे भवितव्य सांभाळायचे असेल तर पक्षाची प्रतिष्ठा जपणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली या गटाची दादागिरी सहन केली तर भविष्यात कॉंग्रेसच्या बालेकिल्यांवर हा गट घुसखोरी करेल व त्यात पक्षाचेच नुकसान होईल, अशी चिंताही अनेकांना सतावत आहे. नेतृत्व बदलाने या विषयावर तोडगा निघत असेल तर त्यासाठी ती तयारी देखील प्रदेश कॉंग्रेसने दर्शवली आहे, अशीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
राज्यातील या घटनाक्रमांबाबत कॉंग्रेस श्रेष्ठींना अवगत करण्यात आले आहे. पक्षाचे प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांच्याकडे याप्रश्नी तोडगा काढण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. हरिप्रसाद याप्रसंगी नेमकी काय भूमिका घेतात व हा घोळ कसा संपुष्टात आणतात याकडेच कॉंग्रेसजनांची नजर लागून आहे.

No comments: