Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 2 March, 2010

...तर मंत्र्यालाही अटक करा!

ड्रग माफिया 'डुडू' प्रकरणात
आग्नेल फर्नांडिस यांची मागणी

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): डेव्हिड द्रिहाण ऊर्फ"डुडू' या आंतरराष्ट्रीय ड्रग माफियाला संरक्षण देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करा अशी संतप्त मागणी कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी केली असून जर "डुडू' याला एखाद्या मंत्र्याकडून संरक्षण दिले जात असल्याचे तपासात आढळून आले तर त्या मंत्र्यालाही त्याच कलमानुसार अटक करण्यात यावी अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी घेतली आहे.
गोव्याच्या किनारी भागांत व खास करून कळंगुट व कांदोळी भागांत चालणाऱ्या अंमलीपदार्थ व्यवहारांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या श्री. फर्नांडिस यांनी "डुडू' प्रकरणी सध्या आक्रमक पवित्रा घेतला आहे. "गोवा अमली पदार्थांचा अड्डा बनण्यात "डुडू'सारख्या ड्रग माफियाएवढेच त्याला संरक्षण देणारे पोलिस आणि राजकारणीही जबाबदार असून सहआरोपी म्हणून "त्या' तिन्ही पोलिसांना अटक केली जावी, असे श्री. फर्नांडिस "गोवादूत'शी बोलताना म्हणाले. आत्तापर्यंतच्या पोलिस तपासात एक पोलिस निरीक्षक आणि दोन पोलिस हवालदार "डुडू' याच्याशी घनिष्ठ संबंध ठेवून होते आणि पोलिस खात्याची गुप्त माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवत होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. दोन वर्षापूर्वी "डुडू' याला अटक करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याने काढलेल्या एका आदेशाची प्रतही "डुडू' याच्या बंगल्यावर आढळून आली होती. त्यामुळे सध्या या प्रकरणी चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने कळंगुटचे सत्ताधारी आमदार बोलत होते.
अमली पदार्थ व्यवसायामुळे किनारपट्टी क्षेत्रातील तरुणांची स्थिती एकदम बिकट झाली आहे. त्यांना व्यसनाधीन करण्यात आले आहे. "इझी मनी'च्या नावाखाली अनेक तरुण नकळत या व्यवसायात ओढले जात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आपण विधानसभेत या घातक व्यवसायाविरोधात आवाज उठवत आहोत. परंतु, या संदर्भात कोणतीही शासकीय यंत्रणा ठोस पावले उचलायला तयारच नसल्याची खंत यावेळी आमदार फर्नांडिस यांनी व्यक्त केली.
पोलिस संरक्षण मिळाल्याशिवाय कोणताही अनैतिक धंदा चालू शकत नाही. पोलिसांच्या मदतीनेच "डुडू'ने गेली बारा वर्षे अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली आहे. एका बाजूने राज्याचे गृहमंत्री गोव्यात अमली पदार्थ नसल्याचे वक्तव्य करतात आणि दुसरीकडे किनारपट्टी क्षेत्रात ड्रग्सचा व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. यातला विरोधाभास अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले. पोलिस खात्याने केवळ पोकळ वल्गना करून गप्प न बसता "डुडू'ला पकडण्यासाठी दाखवलेली हिंमत आजही राजरोसपणे अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या अशा कित्येक "डुडू'ना जेरबंद करण्यासाठी दाखवावी, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या व्यवसायात प्रचंड पैसा असल्याने पोलिस अशा ड्रग माफियांच्या सहज आहारी जातात. त्यासाठी ते केवळ छोट्या मोठ्या माशांना अटक करून आपण कारवाई करीत असल्याचे भासवतात. गेल्या काही वर्षात अमली पदार्थ विरोधी पथकाने केवळ नेपाळी व्यक्तींना अटक करून केवळ तीच व्यक्ती अमली पदार्थाचा व्यवसाय करीत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ही व्यक्ती कोणत्या ड्रग माफियांना हा ड्रग पुरवण्यासाठी आली होती, किंवा कुठून हा अमली पदार्थ आणला होता, याचा कोणताही तपास त्यांनी केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही प्रकरणात तर, पकडण्यात आलेले "ड्रग्स' बनावट असल्याचेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकात अनेक त्रुटी असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments: