Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 1 March, 2010

"ज्ञानोबा माझा'ला दणकेबाज प्रतिसाद

पणजी, दि. २८ - विश्वकल्याणाचा संदेश आपल्या पसायदानाद्वारे देणारे संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज हे महाविष्णूंचे अवतार मानले जातात. तरुण वयात घेतलेल्या संजीवन समाधीपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास हा नाट्यपूर्ण व विस्मयजनक होता. या जीवनचरित्रावर आधारित "ज्ञानोबा माझा' या नाटकाचा प्रयोग नुकताच पैंगीण येथे झाला व त्याला रसिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, श्री माऊली आणि त्यांच्या भावंडांची कामे करणारी मुले शालेय वयातीलच ( ८ ते १४ वर्षे) असूनही, त्यांच्यासह सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका मोठ्या ताकदीने पेलल्या आहेत. श्रीज्ञानेश्वर महाराजांचा जीवनपट माहीत असतानाही हे नाट्य प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवते.
नाथसंप्रदाय, भागवत संप्रदाय व दत्तसंप्रदायाचे अध्वर्यू श्रीसंत प. पू. श्री. द. ऊर्फ मामासाहेब देशपांडे हे ज्ञानेश्वरी व संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक. ते ज्ञानेश्वर माऊलींचे अनन्य भक्त होते. चैतन्य चक्रवर्ती व कैवल्याचा पुतळा अशी दोन नाटके त्यांनी माऊलींच्या जीवनावर लिहिली.
१९ नाटकांचे दिग्दर्शन करणाऱ्या प. पू. मामांना रंगमंचावरील बारकावे ज्ञात होते. त्यामुळेच श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनातील नाट्य त्यांना खुणावत राहिले आणि त्यातून श्री चैतन्य चक्रवर्ती हे ४ अंकी नाटक त्यांनी लिहिले. प. पू. मामांच्या वाङ्मयाचा पैलू लोकांसमोर यावा म्हणून "श्रीपाद सेवा मंडळ' या संस्थेने या नाट्याची निर्मिती केली. आजच्या काळाची गरज लक्षात घेता मूळ ४ अंकी नाटकाचे पुनर्लेखन संहितेला धक्का न लावता तसेच दिग्दर्शन ज्येष्ठरंगकर्मी अशोक समेळ यांनी केले आहे. याला साजेल अशी नेपथ्यरचना केली आहे राजन भिसे यांनी. ७०० वर्षांपूर्वीच्या रागदारी संगीताची झलक इंडियन फ्युजनच्या धर्तीवर वेळेची मर्यादा लक्षात घेऊन डॉ. विद्याधर ओक यांनी गाण्यातून दाखवली आहे. यासाठी त्यांनी पार्श्वगायक निवडले तेही आजच्या संगीत क्षेत्रातील मातब्बर राहुल देशपांडे व अमोल बावडेकर. प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली आहे ती आपल्या यशस्वी कलाकारांना घेऊन "ऋग्वेद' या प्रथितयश संस्थेने.
माऊलींचे विचार जनमानसात अधिक प्रभावीपणे रुजविण्यासाठी आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे नाटक पाहावे अशी श्रीपाद सेवा मंडळाची संकल्पना आहे. याचा शुभारंभी प्रयोग श्री श्रद्धानंद विद्यालय पैंगीण या संस्थेसाठी झाल्यानंतर आता दुसरा प्रयोग शाळा संकुल कुडचडेकरिता होत आहे. गोमंतकातील इतर प्रयोगांसाठी काही जागा विद्यार्थ्यांकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. श्रीपाद सेवा मंडळाचे कार्य व उद्दिष्ट लक्षात घेऊन अनेक प्रथितयश उद्योजक मदतीसाठी पुढे आले आहेत. साहजिकच नाट्य व संगीतप्रेमी प्रेक्षकांसाठी "ज्ञानोबा माझा' ही खास पर्वणीच.

No comments: