Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 5 March, 2010

'त्या' साट्यालोट्यांचा आज पर्दाफाश होणार

४८ तासांत तपास पूर्ण
करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): अमली पदार्थ व्यवसायातील माफियांशी पोलिस अधिकाऱ्याचे असलेले साटेलोटे धडधडीतपणे उघडकीस आल्याने गृहमंत्रालयात एकच खळबळ माजली असून या प्रकरणाची चौकशी येत्या ४८ तासांत पूर्ण करण्याचे आदेश पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांना देण्यात आले आहेत. सदर आदेश आज दुपारी राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी दिले.
इस्रायली माफियांशी संबंध ठेवून, त्यांना संरक्षण देऊन त्यांच्याकडून पैसे उकळणारे पोलिस अधिकारी आणि अन्य काही पोलिसांच्याविरुद्ध बरेच पुरावे सध्या तपास पथकाच्या हाती लागले असून उद्यापर्यंत "दूध का दूध, पानी का पानी' होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. तब्बल एक तास पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांच्याशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्री रवी नाईक यांनी येत्या ४८ तासांत या प्रकरणाचा "पर्दाफाश' होणार असल्याचा दावा केला.
यापूर्वी अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक म्हणून सेवा बजावत असलेले आणि सध्या जुने गोवे पोलिस स्थानकात असलेले निरीक्षक आशिष शिरोडकर यांचे या प्रकरणात नाव पुढे आले आहे. ते या प्रकरणात दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचे आज पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी सांगितले. "हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असून ड्रग माफियांशी संबंध ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. सध्या इंटरनेटवर झळकत असलेल्या त्या "फुटेज'ची आम्ही तपासणी करीत असून तपासाअंती योग्य तो निर्णय घेतला जाईल' असे आज सकाळी श्री. बस्सी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
"संगणक विषयातील तज्ज्ञ मंडळी त्या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहत आहेत. मी तुम्हांला खात्री देऊ शकतो की येत्या ४८ तासांत योग्य ती कारवाई केली जाईल', असे श्री. नाईक यांनी सांगितले. "असे घडायला नको होते. या पथकातील पोलिस अधिकारी हे लोकांची सेवा करण्यासाठी व ड्रग माफियांना जेरबंद करण्यासाठी असतात. तेच अधिकारी अशा पद्धतीने वागायला लागल्यास ते कदापि सहन केले जाणार नाही', असेही श्री. नाईक यावेळी म्हणाले.
२००८ मध्ये अटाला या ड्रग माफियाच्या केलेल्या "स्टिंग ऑपरेशन'मुळे पोलिस आणि ड्रग माफियांचे साटेलोटे असल्याचे उघडकीस आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस अधिकारी कशा पद्धतीने "ड्रग पॅडलर'ना संरक्षण पुरवतात, त्यानंतर पकडण्यात आलेल्या "पॅडलरना' सोडण्यासाठी लाखो रुपये आणि अमली पदार्थ कसे घेतात, ही सर्व माहिती याच स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाली आहे. सदर स्टिंग ऑपरेशन हे खुद्द अटाला याच्याच प्रेयसीने केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. "यू ट्यूब'वर झळकत असलेल्या या व्हिडिओसोबतच आज आणखी एक व्हिडिओ इंटरनेटवर झळकायला लागला असून, त्यात सदर पोलिस अधिकाऱ्याने अटाला याच्या शिवोली येथील घरी येऊन एक लाख रुपये आणि दोन ग्रॅम कोकेन घेऊन गेल्याचीही बाबही उघड झाली आहे. त्यावेळी त्या पोलिस अधिकाऱ्याबरोबर दोन पोलिस शिपाईही आले होते, असे अटाला आपल्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला सांगत आहे.

No comments: