Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 5 March, 2010

'जी-७'ला धडा शिकवणार!

एका मंत्र्याला वगळण्याचा कॉंग्रेसचा ठाम निर्धार
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाचा वापर करून "ग्रुप ऑफ सेव्हन' अर्थात जी-७ गटाने सुरू केलेल्या दादागिरीला थोपवण्याचा निर्णय कॉंग्रेस श्रेष्ठींनी घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अरिष्ट टळल्यानंतर लगेच "जी-७' गटाला धडा शिकवण्याची जय्यत तयारी कॉंग्रेसने चालवली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कोणत्याही परिस्थितीत या गटाशी प्रतारणा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे आसन डळमळीत करण्याची खेळी "जी-७' गटाने आखल्याने येत्या काळात सरकाराअंतर्गत द्वंद्व रंगण्याची शक्यता आहे.
मगोचे नेते तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी पुन्हा एकदा कुंभारजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर यांची वर्णी लावण्याची पूर्ण तयारी मुख्यमंत्री कामत यांनी केली होती. अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांचा दबाव वापरून "जी-७' गटाने हा डाव उधळून लावला होता. या घटनेनंतर "जी-७' च्या सर्व सातही नेत्यांनी भेटून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अक्षरशः दमच भरल्याने कॉंग्रेस पक्षाची पूर्ण नाचक्की झाली होती. कॉंग्रेस श्रेष्ठींनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. ढवळीकरांवरील कारवाईला कॉंग्रेस श्रेष्ठींनीच हिरवा कंदील दाखवला होता, त्यामुळे शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांची मध्यस्थी ही थेट कॉंग्रेस श्रेष्ठींनाच आव्हान ठरल्याने कॉंग्रेसने हा प्रतिष्ठेचा विषय बनवला आहे. सध्या जिल्हा पंचायत निवडणुका व त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने तोपर्यंत धीर धरण्याचे ठरले आहे. एकदा हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अरिष्ट दूर झाले, की या "जी-७' गटाचे वर्चस्व उधळून टाकण्याची तयारी कॉंग्रेसने आखली आहे.
"जी-७' गटानेही आपली ताकद सिद्ध करून दाखवण्याचा चंग बांधला आहे. या गटाशी प्रतारणा करून मुख्यमंत्र्यांनी एकही निर्णय घेतला तर त्यांना या पदावरून खाली खेचल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा निर्धार "जी-७' गटाने केला आहे. विद्यमान कॉंग्रेस सरकारचे भवितव्य हे या गटावरच अवलंबून आहे, त्यामुळे या गटाची उपेक्षा करणे सरकारला अजिबात परवडणारे नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
दिगंबर- मडकईकर भेट
पांडुरंग मडकईकर यांच्या शपथविधी सोहळ्याच्या "फियास्को'नंतर पहिल्यांदाच आज मडकईकर व मुख्यमंत्री कामत यांची आल्तिनो येथील बंगल्यावर बराच वेळ बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. मडकईकर यांची मंत्रिपदावर वर्णी लावण्यास खुद्द श्रेष्ठींनी मान्यता दिल्याने मुख्यमंत्रीही पेचात सापडले आहेत. कोणत्याही परिस्थितीत अर्थसंकल्पानंतर मडकईकर यांची वर्णी मंत्रिमंडळात लागेल, असा विश्वास त्यांनी यावेळी श्री. मडकईकर यांना दिला, अशीही खबर आहे. येत्या काळात ढवळीकरांचा डच्चू अटळ आहे व मडकईकरांचा मंत्रिमंडळ समावेशही निश्चित झाल्याचेच यावेळी सूत्रांकडून कळते.

No comments: