Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 5 December, 2009

यापुढे टपाल खात्याच्या परीक्षा गोव्यातच होणार

संतप्त भाजयुमो व शिवसेना कार्यकर्त्यांना संचालकांकडून आश्वासन
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): टपाल खात्याच्या गोवा विभागात जाहीर करण्यात आलेल्या टपाल / सॉर्टींग साहाय्यक पदांच्या सात जागा भरतीसाठी संगणक नैपुण्य व "एप्टीट्यूट' परीक्षेचे केंद्र सांगली येथे हलवण्यात आल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज गोवा टपाल विभागाच्या संचालक वीणा श्रीनिवास यांना घेराव घालण्यात आला.
या परीक्षा येत्या रविवार ६ रोजी होणार आहेत, त्यामुळे शेवटच्या क्षणी त्या रद्द करून परीक्षा केंद्र इथे हलवणे शक्य नाही. भविष्यात गोवा विभागाच्या परीक्षा या गोव्यातच होणार यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
गोवा टपाल विभागात अलीकडेच टपाल / सॉर्टींग साहाय्यकपदांसाठी सात जागा घोषित झाल्या आहेत. या जागा भरण्यासाठीचे परीक्षा केंद्र सांगली येथे हालविण्यात आल्याने भाजयुमोचे अध्यक्ष रूपेश महात्मे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी श्रीमती वीणा श्रीनिवास यांना घेराव घातला. श्रीमती श्रीनिवास यांची याच महिन्यात नेमणूक झाली आहे, त्यामुळे त्यांना या एकूण प्रकाराबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांनी यावेळी या शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. आता ऐन वेळी परीक्षा रद्द करून ठिकाण बदलणे शक्य होणार नाही परंतु भविष्यात गोव्यासाठीची परीक्षा गोव्यातच होणार याची आपण खात्री देते असेही त्यांनीे सांगितले. गोवा विभागाअंतर्गत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सांगली विभाग येतो व गोवा हे या विभागाचे मुख्यालय आहे. यापूर्वी टपाल खात्यात जाहीर होणाऱ्या पदांसाठी परीक्षा गोव्यातच व्हायच्या परंतु यावेळी मात्र हे परीक्षा केंद्र सांगली येथे हलवण्यात आले आहे. गोवा विभागासाठी जाहीर झालेली सात पदे ही फक्त गोमंतकीयांना मिळावी,अशी मागणी यावेळी भाजयुमोनी केली. हे परीक्षा केंद्र इतरत्र हालवून या जागांवर गोव्याबाहेरील अन्य विभागाच्या उमेदवारांना भरती करण्याचाही डाव असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान, गोव्यातून या पदांसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना आता सांगली येथे परीक्षेसाठी जाणे भाग पडणार आहे. गोवा टपाल खात्यात बहुतेक अधिकारी हे बाहेरील आहेत, त्यामुळे अशी पदे जाहीर झाल्यानंतर आपल्या सग्यासोयऱ्यांना व नातेवाइकांना भरती करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. गोवा हे स्वतंत्र राज्य असल्याने गोवा टपाल खात्याचा व्यवहारही स्वतंत्र करावा,अशी मागणीही यापूर्वी वारंवार झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात विविध परीक्षांसाठी हजर राहणाऱ्या इतर राज्यांतील उमेदवारांना यापूर्वी मनसेकडून मारहाण होण्याचे प्रकार घडले आहेत,अशावेळी गोमंतकीय उमेदवारांच्या सुरक्षेची हमी कोण देणार,असा सवालही यावेळी भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी केली. याप्रसंगी भाजयुमोचे उपाध्यक्ष रूपेश हळर्णकर, भगवान हरमलकर, दीपक नाईक, उत्तर गोवा अध्यक्ष दीपक कळंगुटकर, खजिनदार दीपक म्हापसेकर, म्हापसा अध्यक्ष नरेश उसगांवकर, मडकई अध्यक्ष दिनेश वळवईकर, फोडा अध्यक्ष अपूर दळवी, सांस्कृतिक विभागाचे निमंत्रक सिद्धनाथ बुयांव, विद्यार्थी मंडळाचे सिद्धेश नाईक, सिद्धार्थ कुंकळ्ळेकर व इतर उपस्थित होते.
शिवसेनेचाही पाठिंबा
भाजयुमोने घातलेल्या घेरावानंतर तिथे गोवा राज्य शिवसेनेचे प्रमुख उपेंद्र गांवकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचेही पदाधिकारी व कार्यकर्ते हजर झाले.त्यांनीही हीच मागणी लावून धरत गोव्यातील उमेदवारांसाठी गोव्यातच परीक्षा व्हायला हव्यात अशी मागणी केली.भाजयुमो व शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र झाल्याने याठिकाणी टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांवर मात्र बराच दबाव वाढला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस संरक्षणही मागवण्यात आले.उपनिरीक्षक तुषार लोटलीकर व राहूल परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कुमक तैनात होती.

No comments: