Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 4 December, 2009

तोतया 'एसीपी' झाला गोव्यात 'चतुर्भुज'

प्रेयसीच्या वडिलांनाच लाखो रुपयांना गंडा
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) : पंजाब पोलिसांत साहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी)असल्याचा बहाणा करून आपल्याच प्रेयसीच्या पित्याला लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या हिमाचल प्रदेश येथील मुकेश शर्मा या २१ वर्षीय तरुणाला पणजी पोलिसांनी अटक केली आहे. पणजीतील एका गेस्ट हाऊसमध्ये हा तोतया पोलिस अधिकारी आपल्या प्रेयसीबरोबर राहात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.
सदर तरुणी गोव्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असून तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याविषयी मुलीच्या वडिलांनी पणजी पोलिसांत तक्रार सादर केली होती. तसेच संशयित मुकेशने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची सहीची नक्कल करून बनवलेली बनावट प्रमाणपत्रेही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहेत. मुकेशला चौकशीसाठी काल रात्री ताब्यात घेण्यात आले तेव्हा त्याने आपण गोव्यात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी खास मोहिमेवर आल्याचे सांगितले. तथापि, त्याचे बोलणे संशयास्पद वाटल्याने पोलिस स्थानकावर आणून त्याची "खास' चौकशी करण्यात आली आणि सत्य उघडकीस आले. गेल्या ऑगस्टपासून मुकेशने आपल्या प्रेयसीबरोबर सदर गेस्टा हाऊसमधे तळ ठोकला होता. तसेच आपण पोलिस आयुक्त असल्याचे सांगून गेस्ट हाऊसमध्ये आपला वचकही निर्माण केला होता.
'ओर्कुट' ते गोवा...
उपलब्ध माहितीनुसार मुकेश व ती मुलगी यांची ओळख "ओर्कुट'वर झाली व प्रेमही जुळले. सुरुवातीला मुकेशने आपण पोलिस निरीक्षक असल्याची बतावणी केली. त्यामुळे तिने त्याच्यावर जरा जास्तचविश्वास ठेवला. काही महिन्यांनी तिने त्याला भेटीसाठी गोव्यात बोलावले. गोव्यात येताना मुकेश पंजाब पोलिस खात्याचा साहाय्यक पोलिस आयुक्त बनून आला. मग त्याने आपल्या प्रेयसीच्या पित्यालाच फोन करून लाखो रुपये उकळले. तसेच आपण दहशतवादविरोधी मोहिमेत व्यस्त असून तुम्हालाही यात गुंतवू शकतो, अशी धमकी दिली.
'कोब्रा'ने तोडले अकलेचे तारे...
सुरुवातीला काही पैसे दिल्यानंतर हा खराच पोलिस अधिकारी आहे का, हे जाणून घेण्यासाठी सदर मुलीच्या पित्याने "कोब्रा' या खाजगी सुरक्षा आणि गुप्तचर संस्थेकडे त्याच्यासंदर्भात माहिती मिळवण्याचे काम सोपवले. त्यासाठी या संस्थेला दहा हजार रुपयेही देण्यात आले. काही दिवसांनी "कोब्रा'च्या गुप्तचरांनी तो खरोखरच पंजाब पोलिसांत "एसीपी' असल्याचे सांगितले. ही माहिती पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली. त्यामुळे "कोब्रा'च्या अधिकाऱ्यांना पोलिस चौकशीसाठी उद्या बोलावण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहाणपणा नडला...
पोलिस अधिकारी असूनही आपल्याकडे पैसे मागत असल्याने त्या मुलीच्या पित्याचा संशय बळावला. त्यांनी काल पणजी पोलिसांत तक्रार सादर केली. त्यानुसार रात्री त्या गेस्ट हाऊसवर छापा टाकून प्रेयसीसह पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक प्रज्योत फडते करीत आहेत.

No comments: