Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 2 December, 2009

नकली पिस्तूल व बॉम्बच्या धाकाने बॅंक लुटण्याचा प्रयत्न

डिचोलीत भर दुपारी थरारनाट्य
डिचोली, दि. १ (प्रतिनिधी): डिचोली येथील स्टेट बॅंकेच्या शाखेत बॉम्बसारखी दिसणारी वस्तू ठेवून आणि कॅशियरवर नकली पिस्तूल रोखून पाच कोटींची मागणी करणाऱ्या एका माथेफिरूने आज गोंधळ माजविला. बॉम्बस्फोट घडवून इमारत उडवून देण्याच्या त्याच्या धमकीने बॅंक परिसरात भर दुपारी एकच खळबळ उडाली.
आज दुपारी एकच्या दरम्यान येथील एका बेकरीत काम करणारा कर्मचारी नारायण शंकर यादव (मूळ बेळगावचा) स्टेट बॅंकेत कॅशियरच्या केबिनमध्ये गेला व त्याने पिण्यासाठी पाणी मागितले.त्याचवेळी कॅशियरच्या डोक्याला पिस्तूल लावत पाच कोटी रुपयांची मागणी केली. तीन मिनिटांच्या आत पैसे न दिल्यास आपण याच ठिकाणी ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवून कार्यालय उडवून देण्याची धमकी त्याने दिली. कॅशियर विजय गजांकुष यांना त्याने पैसे की जीव प्यारा आहे,असे विचारत कोणतीही हालचाल न करण्याची तंबी दिली. त्याचवेळी विजय यांनी गंगाराम घोगळे याला हाक मारली, त्यामुळे तो व अन्य अधिकारी केबिनमध्ये आले. सुरक्षा रक्षक मनोहर नारायण राणेही तेवढ्यात आला आणि त्या सर्वांनी यादववर हल्ला करीत त्याचे पिस्तूल हिसकावून घेतले व त्याला खाली पाडले व बराच चोप दिला. यावेळी झालेल्या झटापटीत सुरक्षा रक्षकाच्या मानेला यादवची नखे लागली. बॅंक व्यवस्थापक सत्यवान राणे यांनी धोक्याची सूचना देणारा भोंगा वाजवल्याने अनेक जण सतर्क झाले.
डिचोली पोलिसांनी बॅंकेत धाव घेऊन बॉम्ब सदृश वाटणाऱ्या त्या वस्तूंच्या तपासणीसाठी बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण केले. गाठोड्यातून टीक टीक आवाज येत राहिल्याने पोलिसांनी ही खबरदारी घेतली. ज्यावेळी खास पथकाने हे गाठोडे उघडून तपासणी केली, त्यावेळी बॉम्ब नकली असल्याचे दिसून आले. चिनी बनावटीच्या मोबाईलचा रिमोटसारखा वापर करून बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू व स्कूटरचा फूट पंप बॉम्ब म्हणून ठेवल्याचे दिसून आले. या नकली वस्तू असल्याचे उघड झाल्याने डिचोलीवासीयांनी सुस्कारा सोडला. तोपर्यंत दोनतीन तास तेथे तणावपूर्ण वातावरण होते. बॅंक कर्मचारी गंगाराम घोगळे, सत्यवान हळर्णकर, विजय गजांकुष, मनोहर राणे यांनी धैर्याने संबंधिताला पोलिसाच्या स्वाधीन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. आज महिन्याचा पहिलाच दिवस असल्याने बॅंकेत गर्दी होती. अशावेळी लुटण्याचा हा धाडसी प्रयत्न केला गेला.
दरम्यान, स्थानिक आमदार राजेश पाटणेकर यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

No comments: