Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 5 December, 2009

खाण लीज परवाने हे मोठे षडयंत्र

'उटा'चे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप यांचा आरोप
मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी): केपे तालुक्यांतील बाळ्ळी,मोरपिर्ला,बेतूल,बार्से या भागातील मिळून दोन हजारांवर हेक्टर टापूत खाणींच्या लीजना परवाने देण्यासाठी सुरू झालेली हालचाल म्हणजे तेथील संख्येने १०० टक्के असलेल्या अनुसूचित जमातीतील लोकांना देशोधडीला लावण्याचा कट आहे,असा आरोप माजी मंत्री तथा "उटा' चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी आज केला व बळजबरीने हे लीज दिले तर सेझविरोधी आंदोलनाची पुनरावृत्ती घडेल असे बजावले. यामागे मोठे षड्यंत्र असल्याचा दावाही त्यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की , या लीजसाठी हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ज्या अधिसूचना जारी झाल्या आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आहेत मग सरकारने या नोटिसांबाबत कानावर हात ठेवण्यात अर्थ तो काय राहतो. हे लीज दिले तर केपे तालुक्यांतील ९० टक्के भाग खाणी खाली जाईल व तेथील अनुसूचित जमातींतील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधनच हिरावून घेतले जाईल व तालुक्याचा संपूर्णतः पर्यावरणीय ऱ्हास होईल.
आपण मागे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या खाण लीजचे प्रकरण उघड केल्यावर मुख्यमंत्र्यांनी नवीन खाणीचे लीज सरकार देणार नाही असा जो खुलासा केला आहे ती शुध्द फसवाफसवी आहे कारण राज्य सरकारने असे प्रस्ताव मंजूर केल्याशिवाय केंद्रीय खाण मंत्रालय ते पुढील सोपस्कारांसाठी पाठवीत नाही आणि या हरकती बाबतच्या अधिसूचना मुदत संपेपर्यंत आपल्या बॅगेत ठेवून नंतर ज्याअर्थी तलाठी संबंधित पंचायतींच्या सूचनाफलकावर लावतो त्याअर्थी या प्रकरणात कोणी तरी बडी असामी आहे हे उघड आहे. सरकारला अंधारात ठेवून कोणी या नोटिसा जारी केलेल्या असतील तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली. अन्यथा गोव्याबाहेरील कोणीतरी व्यक्ती इतक्या प्रचंड जमिनीत खाणींच्या लीजसाठी अर्जच मुळी कशी करू शकते असा सवाल केला.
या प्रश्र्नावर आता मोठी जनजागृती झालेली आहे व लोक संघटित झाले आहेत व त्यामुळे सेझविरोधी आंदोलनाप्रमाणे आंदोलन उभे राहण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. दरम्यान पोरपिर्ला, बाळ्ळी व बार्से पंचायतीच्या विशेष ग्रामसभा या मुद्द्यावर येत्या रविवारी होत आहेत व त्यांत आंदोलनाची पुढील दिशा ठरेल असा कयास आहे.

No comments: