Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 30 November, 2009

कला व संस्कृतीतूनच मनाचा विकास मधू मंगेश कर्णिक

बा. भ. बोरकर जन्मशताब्दी सोहळा सुरू
पणजी, दि. २९ (सांस्कृतिक प्रतिनिधी)- साहित्यिक, कलावंत, प्रतिभावंत यांना मान देणारा समाज खऱ्या अर्थाने मोठा आहे. कला आणि संस्कृतीतूनच मनुष्याच्या मनाचा विकास होतो. प्रत्येक नागरिकाच्या मनाचा विकास झाल्याशिवाय समाजाचा योग्य विकास होत नाही, असे विचार ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले. गोमंतकातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी कै. बा. भ. बोरकर जन्मशताब्दी उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ मराठी कवी मंगेश पाडगावकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री दिगंबर कामत, कार्यक्रम समितीचे उपाध्यक्ष दत्ता दामोदर नायक, भाई मावजो, कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
बोरकरांचा आणि आमचा स्नेह पन्नास वर्षांपूर्वी जुळून आला होते. बोरकर म्हणजे जणू संवेदनाचा उत्सव आणि कवितेचा महोत्सव होते. त्यांच्या त्या महोत्सवात भिजण्याचा योग माझ्या नशिबी आला हे माझे भाग्यच समजतो, असेही त्यांनी पुढे सांगितले. कवितेसंदर्भात असलेल्या जिद्दी ध्यासाच्या जोरावरच बोरकरांनी आपल्या कवितेतून निसर्ग आणि मानवतेचे नाते केवळ गोव्यालाच नव्हे तर देशाला दाखवले, असेही ते म्हणाले. बोरकरांच्या कविता त्यांच्या मुखातून ऐकण्याची संधी आम्हाला पुष्कळदा मिळाली. कुठल्या संमेलनात किंवा समारंभात ते कविता सादर करायला लागले की एखादा राजपुत्र दरबारात येऊन दरबार काबीज करतो त्याचप्रमाणे ते श्रोत्यांवर ताबा मिळवायचे. कारण त्यांच्या कविताच तेवढ्या दर्जेदार असायच्या. त्यांच्याच जन्मभूमीत त्यांची जन्म शताब्दी साजरी होते ही आनंदाची गोष्ट आहे आणि या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचा ऋणी आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
बोरकर यांच्यासोबत व्यतीत केलेल्या आठवणी ताज्या करताना मंगेश पाडगावकर म्हणाले की बोरकरांनी माझ्या आई वडिलांइतकेच प्रेम मला दिले. माझ्यातील कवी त्यांनी माझ्या बालपणातच हेरला आणि मला प्रोत्साहन दिले. त्यांची कविता वाचूनच मी माझी पहिली कविता लिहिली. त्यांच्या कवितेतील शब्द म्हणजे उच्च संगीताची गंगोत्रीच. इंद्रियनिष्ठ संवेदना व्यक्त करण्याची ताकद त्यांच्या कवितेत आहे. बोरकरांसारखे महान कवी या मातीत जन्मले आणि त्यांनी आपली रसिकता कायम टिकवली. गोव्याच्या रसिकांनी रसिकता टिकवून ठेवावी, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. या व्यतिरिक्त मधू मंगेश कर्णिक व मंगेश पाडगावकर यांनीही आपल्या शैलीत बोरकरांच्या कविता सादर केल्या.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच बोरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बा. भ. बोरकर जन्मशताब्दी उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम सुरू झाला. कला आणि संस्कृती संचालनालय व कै. बा. भ. बोरकर जन्मशताब्दी कार्यक्रम समिती आयोजित या सोहळ्यात बोरकरांच्या आठवणींचा गंध अनेक मान्यवरांनी पसरवला. अशा या सुगंधित वातावरणात धुंद झालेल्या रवींद्र भवनात संपन्न झालेल्या साहित्य उत्सवात या सोहळ्याने रंगत आणली.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दत्ता नायक यांनी बा. भ. बोरकर म्हणजे सांस्कृतिक मखरातील दैवत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील गोव्याचा मानदंड असल्याचे सांगितले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात वर्षभर विविध कार्यक्रम सादर केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. भाई मावजो यांनी स्वागत केले. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात आज सकाळी डॉ. अजय वैद्य, सुमेधा देसाई, चंद्रकांत वेर्णेकर, राया कोरगावकर, दयेश कोसंबे यांनी बोरकर यांची चलचित्रे, कविता वाचन आणि गीतगायन सादर करून रसिकांना बोरकरांच्या अनोख्या काव्यमय विश्वाचा प्रवास घडवून आणला.

No comments: