Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 29 November, 2009

हळदोणे ग्रामसभेत आज पायवाटेचा मुद्दा गाजणार

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): हळदोणे पंचायत क्षेत्रातील खोर्जुवे-कोळम येथे बांधण्यात आलेल्या एका बांधकामामुळे अनेक वर्षांची वाट बंद होऊन शेतात तसेच गणेशविसर्जनाला नदीकाठी जाण्याचा मार्गच बंद झाला आहे, अशी तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी पंचायतीकडे केली आहे. तथापि, त्याकडे दुर्लक्ष करीत हा मुद्दा "क्षुल्लक'असल्याचे सांगून तो उद्याच्या ग्रामसभेत उपस्थित करण्यासही पंचायतीने संमती नाकारली आहे. रविवारी होणारी हळदोणेची ग्रामसभा याच मुद्यावरून गाजण्याची शक्यता असून, पंचायतीने याबाबत घेतलेल्या पक्षपाती भूमिकेवरून गदारोळ माजण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. हे बांधकाम एका नामवंत चित्रपट अभिनेत्याचे असल्याने त्यावर कारवाई करण्यात कुचराई केली जात असल्याची चर्चा या भागात सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोळम येथील सदर "बांधकाम' नगरनियोजन खाते, म्हापसा यांनी बेकायदा ठरवून, ही जागा किनारी नियामक विभाग (सीआरझेड) खाली येत असल्याने तेथे केलेले कोणतेही बांधकाम कायदेशीर ठरु शकत नाही,असे २४ सप्टेंबर २००८ रोजी लेखी पत्रात पंचायतीला कळविले आहे. या पत्रावर वर्टीका डागूर या नगरनियोजकाची सही आहे. सर्व्हे क्रमांक ४२\२ मध्ये एक जुने पडके घर होते, त्या जागेसह बाजूची ४२\१ ही जागा खरेदी करून या ठिकाणी एक एकमजली छोटी इमारत उभी राहिली आहे. या दोन्ही जागा एकत्रित करण्यात आल्याने त्यामधून जाणारी पायवाट आता कायमची बंद झाली आहे. ग्रामस्थांनी आपल्याला कुठल्याही एका बाजूला वाट देण्याची केलेली विनंती फेटाळून हे बांधकाम उभे राहिले आहे.या बांधकामाला ग्रामस्थांनी हरकत घेतल्यावर पंचायतीने नव्या घराला दिलेला जुन्या घराचा क्रमांक मागे घेण्यात आला व ते बांधकाम पाडण्याचा आदेश १८ एप्रिल २००९ रोजी दिला होता. त्यानंतर आता पंचायतीने तेच बांधकाम "फार्महाऊस' म्हणून कायदेशीर करण्याचा ठराव घेतला आहे,अशी माहिती मिळाली आहे. यासंबंधी ३० ऑक्टोबर २००९ रोजी पंचायतीने अशा आशयाचा ठराव संमत केल्याचे सांगण्यात येते. खरेदीपत्र करून ही जागा कायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आलेली असली तरी त्यानंतरचे बांधकाम मात्र बेकायदा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, पंचायतीने ते मोडण्याचा आपलाच आदेश बदलून आता "सीआरझेड' कक्षेतील हे घर कायदेशीर करण्याचा घाट घातला असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

No comments: