Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 1 December, 2009

सुलोचनादीदींना 'महाराष्ट्र भूषण'

मुंबई, दि.३० : आपल्या सहज सुंदर अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आदराचे स्थान मिळविणाऱ्या अभिनेत्री सुलोचनादीदी यांना यंदाचा "महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २६ जानेवारी रोजी त्यांना समारंभपूर्वक त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी या पुरस्काराने गौरविले जाते. यंदा शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या निवडीवर आज शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा निर्णय घेतला. ५ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यापूर्वी हा पुरस्कार पु.ल.देशपांडे, लता मंगेशकर, सुनील गावस्कर, भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, रतन टाटा, मंगेश पाडगावकर, नानासाहेब धर्माधिकारी, अभय व राणी बंग, विजय भटकर, रा. कृ. पाटील आदी मान्यवरांना मिळाला आहे.
यंदा महाराष्ट्र भूषण ठरलेल्या सुलोचनादीदींचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव रूबी मेयर्स असे आहे. ख्यातनाम दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरू. त्यांच्याच तालमीत सुलोचनादीदी तयार झाल्या. २५० हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. मराठी चित्रपटात जशी त्यांनी "आई' जिवंत केली तशीच प्रतिमा हिंदीतही निर्माण झाली होती. ७० आणि ८० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत निरूपा रॉय यांच्यानंतर सुलोचना यांची "मॉं' अतिशय गाजली. २००३ मध्ये त्यांना चित्रभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. उशीरा का होईना पण, शासनाला सुलोचनाबाईंची आठवण झाली, याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीत समाधान व्यक्त केले जात आहे.
'हा माझ्यासाठी घरचाच आहेर'
ज्या महाराष्ट्रात मी जन्मले, ज्या महाराष्ट्रात माझं करिअर घडलं आणि ज्या महाराष्ट्राने मला आई, वहिनी म्हणून स्वीकारलं त्याच माझ्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पुरस्कारावर माझं नाव कोरलं जाणार आहे, याचा आनंद शब्दात सांगता येणारा नाही, अशी काहीशी भावूक प्रतिक्रिया अभिनेत्री सुलोचना यांनी व्यक्त केली.
हा पुरस्कार आपल्या घरचा आहेर असल्यासारखे वाटत आहे. पुरस्काराची बातमी कळल्यावर मन आनंदाने भरून आले. मी जे काम केले त्याचं सार्थक झाले आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
आज या आनंदाच्या प्रसंगी पहिली आठवण होते ती माझे गुरू भालजी पेंढारकर यांची... त्यांनी मला घडविलं, माझ्यावर जे संस्कार केले, जे कष्ट घेतले त्या कष्टांचा हा सन्मान आहे. माझी आई आणि इतर सगळे कुटुंबीय ज्यांनी मला या क्षेत्रात काम करायला पाठिंबा दिला आणि माझे सहकलाकार सगळ्यांची या क्षणी प्रकर्षाने आठवण होतेय. महाराष्ट्रातील रसिकांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाला तोड नाही. ते प्रेम मी आयुष्यभर विसरू शकत नाही, असेही सुलोचनाबाई कृतज्ञतेने आणि नम्रपणे नमूद करतात.

No comments: