Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 1 December, 2009

अखेर मधु कोडा यांना अटक

रांची, दि. ३० : कोट्यवधींच्या हवाला घोटाळा प्रकरणातील आरोपी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना आज दक्षता विभागाने अटक केली.
दक्षता विभागाचे पोलिस महानिरीक्षक एम. व्ही. राव यांनी ही माहिती दिली. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील डुमरी येथून कोडा यांना अटक करण्यात आली आहे. दक्षता विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. आज सकाळी कोडा यांना अटक झाली. तेथून त्यांना रांची येथे आणण्यात आले आहे. येत्या ४ डिसेंबर रोजी त्यांना कोर्टापुढे हजर केले जाणार आहे.
३८ वर्षीय कोडा हे आज निवडणूक प्रचार सभेसाठी सरेईकेला येथे जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. हवाला प्रकरणी अटकेपासून वाचण्यासाठी कोडा हे सतत प्रयत्नरत होते. २७ नोव्हेंबरला त्यांना दक्षता आयोगासमोर हजर राहायचे होते. पण, त्यांनी आयोगाच्या समन्सचा अवमान केला आणि अनुपस्थित राहिले. त्यासाठी त्यांनी झारखंडमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराचे कारण समोर केले. एवढेच नव्हे तर त्यांनी चक्क दक्षता विभागाला पत्र लिहिले की, झारखंडमधील निवडणुका १८ डिसेंबरला संपत आहेत. त्यापूर्वी ते आयोगासमोर हजर राहू शकत नाहीत. त्यानंतरच ते चौकशीला सामोरे जातील. आता या प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांची अटक अपरिहार्य होती, असे राव यांनी सांगितले.
चार हजार कोटी रुपयांच्या हवाला घोटाळ्यात मधु कोडा यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. पण, कोडा यांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला आहे.

No comments: