Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 5 December, 2009

पोलंडचा 'तोतया' राजदूत अटकेत

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): गोव्यात सध्या तोतया अधिकाऱ्यांनी थैमान घातले असून पंजाबच्या बनावट पोलिस आयुक्तानंतर आज पणजी पोलिसांनी पोलंड देशाचा तोतया राजदूताला अटक केली आहे. हा बनावट राजदूत ज्या हॉटेलमध्ये उतरला होता, त्याच हॉटेलमध्ये अनायासे खरे राजदूत पोचल्याने या तोतया राजदूताला गोवा पोलिसांच्या तुरुंगाची हवा खावी लागली. या तोतया राजदूताचे नाव संतोष के. महेशीका असे असून आज सकाळी त्यांना अटक केली. याविषयीची पोलिस तक्रार मुंबई येथील पोलंड देशाचे राजदूत जानुझ बायलिंस्की यांनी सादर केली होती. दरम्यान, काल अटक करण्यात आलेला तोतया पोलिस आयुक्ताला सात दिवसाची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार संतोष हा काही दिवसापूर्वी गोव्यात आला होता. त्यानंतर त्याने वायगिणी हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. यात त्याने आपण पोलंड देशाचा हैद्राबाद येथे असणारा राजदूत अशी नोंद केली. तसेच हॉटेलचे सर्व बिल आपल्या दूतावासात पाठवून देण्याचीही सूचना त्यांना केली होती. परंतु, २९ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील खरा राजदूत जानुझ बायलिंस्की आला असता त्यांना आपलाच देशाचा अजून एका राजदूत या हॉटेलमध्ये उतरल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्याने त्याची चौकशी केली असता त्याचा या दूतावासाशी कोणताही संबंध नसल्याचे उघड झाले. याची आज सकाळी पोलिस तक्रार देण्यात आली. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक योगेश पेडणेकर करीत आहे.

No comments: