Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 29 November, 2009

गुंड बेंग्रेला पोलिस कोठडीत घेण्याच्या हालचालींना वेग

बिच्चूवरील हल्लेखोरांना सहा दिवसांची पोलिस कोठडी
बिच्चू याच्या खुनाचीच 'सुपारी' दिल्याचे उघड

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) : गुंड 'बिच्चू' याच्यावर खुनी हल्ला करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आश्पाक बेंग्रे पोलिसांच्या ताब्यात येताच त्यावर अधिक प्रकाश पडणार असल्याचा दावा पणजी पोलिसांनी केला आहे. दरम्यान, तुरुंगातून "सुपारी' देऊन हा हल्ला घडवून आणणारा कुविख्यात गुंड आश्पाक बेंग्रे याला पोलिस कोठडीत घेण्यासाठी येत्या सोमवारी न्यायालयात अर्ज सादर केला जाणार असल्याचे पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले. या खुनी हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व म्हणजे सहा संशयितांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करून १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली.
या प्रकरणात आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता असल्याचे श्री. चोडणकर यांनी सांगितले. हल्ला झाल्यानंतर त्यातील हल्लेखोरांना तातडीने गजाआड केल्याबद्दल पणजी पोलिसांचे
कौतुक होत आहे. कारण, अजून काही तासांचा उशीर झाला असता तर हल्लेखोर गोव्यातून पसार झाले असते, असे सूत्रांनी सांगितले.
खुनाचीच "सुपारी' होती...
बिच्चू याला कायमचा संपवण्याची ही सुपारी होती, असा दावा पोलिसांनी केला आहे. हे केवळ सहा जणांचे काम नसून या हल्ल्याचा कट रचण्यात अजून काहीं जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. हा हल्ला करण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याची प्राथमिक माहिती उघड झाली असली तरी, ते पैसे देण्यात आले होते की द्यायचे होते, हे पैसे कोण देणार होता, तसेच हल्ल्यात वापरण्यात आलेले चॉपर कोणी उपलब्ध करून दिले, याचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिसांचे यश...
बिच्चू या गुंडावर प्रत्यक्ष हल्ला करणारा रमेश दलवाई हा बेळगावचा, तर मोहंमद रेहमान हा दिल्लीचा
असल्याने त्यांना कोणीही ओळखत नव्हते. तसेच त्यांची कोणतीही विशेष माहिती पोलिसांकडे उपलब्ध नव्हती. म्हणून त्यांना अटक करणे हे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
या हल्ल्यामागे अश्पाकचाच हात असल्याची प्राथमिक खात्री पोलिसांची झाली होती, त्यादिशेने पोलिसांनी तपासकाम सुरू केले असता, हल्लेखोर कुठे लपले आहेत, याची माहिती पोलिसांच्या हाती आली. त्या दिवशी रमेश, मोहंमद आणि दुचाकी चालवणारा संजय लिंगुडकर हे तिघे थेट मडगावला गेले होते. मडगाव कदंब बसस्थानकावर त्यांनी ती दुचाकी सोडली आणि तेथून ते पुन्हा पणजीला आले. त्यानंतर ते वास्कोला निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परंतु मडगाव येथून ते पणजीला कसे आले, याचा शोध पोलिस घेत आहेत.
हल्लेखोर वास्को येथे भाड्याच्या खोलीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्यासह अन्य पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना अटक केली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक तुषार लोटलीकर, राहुल परब, रत्नाकर कळंगुटकर, तर पोलिस हवालदार उल्हास खोत, ज्युलियो दिनिज, अभय देसाई व श्रीराम साळगावकर तसेच, पोलिस शिपाई शेखर आमोणकर, नीलेश नाईक, शिवाजी शेटकर व राया मांद्रेकर यांचा सहभाग होता.

No comments: