Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 29 November, 2009

'आमचे आबा' ; भारती हेबळे

यंदा बोरकरांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ होत आहे. त्यासाठी खाजगी व सरकारी पातळीवर आत्यंतिक प्रेमाने व आत्मियतेने ठिकठिकाणी कार्यक्रम होत आहेत. बोरकरांना जाऊन आज २५ वर्षे लोटली तरीही लोक त्यांना विसरलेले नाहीत ते कालही प्रिय होते, आजही आहेत व असेच अमर राहतील. त्यांच्याबद्दल वाटणारा अमाप स्नेह, त्यांच्या कवितेद्दलची ओढ व प्रेम पाहून माझं मन भरून आल आहे. मला खात्री आहे हे सर्व त्यांच्या आत्म्याला नक्कीच शांतीच देईल.
माझ्या वडिलांना आम्ही "आबा' म्हणायचो. त्यांचा मित्र परिवार फार मोठा. प्रांताप्रातातून त्यांचे मित्र आहेत. ते नेहमी म्हणायचे मित्र म्हणजे माझी बॅंक. त्यांनी या सगळ्यांवर जीवापाड प्रेम केले. ते म्हणायचे हेच माझे बलस्थान आहे. त्यांच्याकडून अमाप प्रेम, भरपूर आशीर्वाद मिळविणे हेच मी अधिक महत्त्वाचे मानतो.
आबांचा संसारही मोठा होता. आम्ही सहा बहिणी व दोन भाऊ. आमचे बालपण पुण्यात गेले. आमच्याकडे मोठमोठे लेखक, कवी यायचे त्यांना जवळून पाहायचे भाग्य आम्हाला लाभले. तेव्हा मैफली व्हायच्या. आबा अगदी उत्साहात, तन्मयतेने सुरेल आवाजात कविता गाऊन दाखवायचे. त्यामुळे वेळेचे भान नसायचे. भूक तहान हरपायची.
आबांची प्रेमळ सावली आम्हा सर्व भावंडाना गतजन्मीच्या पुण्याईमुळे लाभली.
त्यांचे संस्कार, परंपरा कायम राखून आम्ही भावंडे एकीचे वैभव जगापुढे मिरवित आहोत. आबांनी आम्हा सर्वांना एक गोष्ट मनावर बिंबवण्यास सांगितली आणि ती त्यांच्याच शब्दात सांगते. "न्यायाला ईश्वर नेहमीच सहाय्य करतो, अन्यायाचे कौतुक समाजाने कितीही केले तरी त्या कौतुकाचे वैभव अकाली येणाऱ्या मेघाप्रमाणे थोड्याच काळात विफल होते. सत्याचा जय होतो'.
आबांनी आम्हाला विचार करण्यास शिकविले. जीवनावर उत्कट पे्रम करण्यास शिकविले. वेळोवेळी आमच्यात जीवनमुल्ये रूजवली व आम्हाला संस्कारीत बनवले. प्रसंगी तत्वज्ञान सांगून धीट बनवले. त्यांच्या कृतीतून प्रसन्न राहून जीवनप्रवासकसा करावा हे आम्ही शिकलो.
आपल्या जीवनकार्याचा निर्णय आम्ही तर्क व स्वतःच्या बुद्धीद्वारे घेतला पाहिजे हे अमृतवचन त्यांनी आमच्या मनावर जणू कोरून ठेवले आहे.
मनाची उदारता, त्यागवृत्ती जेवढी व्यापक करणे शक्य आहे तितकी करावी व तोच खरा मानवधर्म असा उपदेश ते आम्हाला करीत असत. गृहनीतीचे रूप उदात्त आहे. तुम्ही हे आपल्या आचरणात आणाल तर तुमच्या संसारात स्वर्ग अवतरण्यास मुळीच वेळ लागणार नाही असे ते वारंवार सांगत असत.
गोव्यात भाषावाद जेव्हा बोकाळला तेव्हा समाजाने त्यांच्यावर टीकेचे आसून ओढले. तरीही ते शांत राहिले. त्यांचा एक विशेष गुण म्हणजे त्यांनी विरोधकांची कधीच निंदा केली नाही. कोणाविरुद्ध अपशब्द उच्चारला नाही. ते आम्हाला नेहमी सांगत चांगले ते घ्यावे. त्यांना कुणाचीच असुया नव्हती. जे काही मिळेल त्यात ते तृप्त होते.
"घेण्यातील सुख कळले बाई देण्याला त्या मितीच नाही या वृत्तीमुळे पै पाहुण्यांची सरबराई करण्याचे व्रत त्यांनी हौसेने स्वीकारलेले, त्यात पुन्हा गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. या स्थितीतही त्यांचा गृहस्थाश्रम नेटकेपणाने पार पडला. आपल्या यशाचे श्रेय ते आमच्या आईला देतात. तिने त्यांना दिलेली साथ वाखाणण्यासारखीच.
आबा मला सदैव आमच्या सोबत वाटतात. त्यांची रेडिओवरील गाणी, त्यांच्या ऍडिओ कॅसेटस त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. पाठीवर वात्सल्याने फिरलेला त्यांचा स्पर्श सुखावून जातो. आबा एक श्रेष्ठ कवी, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, पत्रकार, कादंबरीकार, कथाकार, अनुवादक, संपादक असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. म्हणूनच असा पिता लाभल्याबद्दल मला धन्य धन्य वाटते.

No comments: