Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 5 December, 2009

बेकायदा खाणींचा उच्छाद

गोव्याचा 'मधू कोडा' उजेडात आणणार : पर्रीकर
विधानसभा अधिवेशनात भाजप होणार अत्यंत आक्रमक

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): गोव्यात मोठ्या प्रमाणावर राजाश्रयाने बेकायदा खाणींचे पेव फुटले असून त्याबाबतची लक्तरे येत्या विधानसभा अधिवेशनात वेशीवर टांगली जातील,असा खणखणीत इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला. बेकायदा खाण प्रकरणांचा पर्दाफाश करून गोव्याचा "मधू कोडा' कोण हे अधिक स्पष्टपणाने जनतेसमोर आणणारच; तसेच चार मुख्य खात्यांतील भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची यादीच सभागृहासमोर सादर केली जाईल, असे स्पष्ट संकेतही पर्रीकरांनी दिले.
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येत्या १५ ते १८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरकारला कशा पद्धतीने कोंडीत पकडावे याचा खल आज भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीत झाला. यासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रपरिषदेत पर्रीकर बोलत होते. भाजप विधिमंडळ उपनेते आमदार फ्रान्सिस डिसोझा व प्रवक्ते आमदार दामोदर नाईक हेही याप्रसंगी उपस्थित होते.
कॉंग्रेस आघाडी सरकारची प्रशासनावरील पकड पूर्णपणे सुटली आहे. राज्यातील जनतेला सध्या कुणीही वाली राहिलेला नाही. सरकारी मंत्री केवळ देश- विदेशवाऱ्या व भ्रष्टाचारात गुंतले आहेत.अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करून सरकार जनतेला सामोरे जाण्यास कचरत असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. हे अधिवेशन जरी चार दिवसांचे असले तरी जनतेला सामोरे जावे लागणाऱ्या महत्त्वाच्या विषयांवर भाजप आक्रमकतेने सरकारवर तुटून पडणार असल्याची माहिती पर्रीकर यांनी दिली.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकूण आठ खात्यांवर चर्चा आहे. या दिवशी खाण खात्यावरून सरकारची पूर्ण दमछाक करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राज्यात बेकायदा खाण व्यवहाराचा उच्छाद सुरू असून राजकीय वरदहस्ताने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचाच गैरवापर होत असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. केपे येथे २६१ व ३११ हेक्टर जागेत नवीन खाण परवाना देण्यासंबंधी दक्षिण गोवा प्रशासकीय यंत्रणेचा ज्या पद्धतीने गैरवापर करण्यात आला त्याचा भांडाफोड या अधिवेशनात केला जाईल. जनतेला हरकती नोंदवण्यासाठी दिलेल्या मुदतीनंतरच हरकती नोंदवण्याची नोटीस जारी केल्याचा अश्लाघ्य प्रकार करण्यात आला. दक्षिण गोव्याचे विद्यमान जिल्हाधिकारी कुणाच्या आश्रयाने तग धरून आहेत हे सर्वपरिचित आहे, असा टोलाही पर्रीकर यांनी हाणला.
गोव्यातही "मधू कोडा' आहेत व ते कोण याचे दर्शन यावेळी अधिवेशनाच्या निमित्ताने जनतेला घडवले जाईल, असेही पर्रीकरांनी सूचित केले. कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत व गृहमंत्री रवी नाईक यांचे स्वतःच्या खात्यावर नियंत्रणच उरलेले नाही. या खात्यावर दुसऱ्या दिवशी अधिवेशन दणाणून सोडले जाईल. कुप्रसिद्ध गुंड अश्पाक बेंग्रे हा न्यायालयीन कोठडीत राहून जर आपल्या गुन्हेगारी जगतावर नियंत्रण ठेवू शकतो तर काम करण्याची पूर्ण मोकळीक असूनही गृहमंत्र्यांना आपल्या पोलिस खात्यावर नियंत्रण मिळवता का येत नाही,असा मूलभूत प्रश्न पर्रीकरांनी उपस्थित केला.
वित्त खात्याच्या हातून कारभार घसरत चालला आहे. सार्वजनिक बांधकाम खाते, आरोग्य या खात्यांत प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. या भ्रष्टाचाराची मुळे वरून खालपर्यंत असून विविध प्रकरणे उजेडात आणून ती उखडण्याचा प्रयत्न या अधिवेशनात भाजप करेल. महसुलातील गळती रोखल्यास आपोआपच तिजोरी भरेल. एकीकडे लूट करून दुसरीकडे तिजोरी भरण्यासाठी व्यावसायिक करासारखे जाचक निर्णय जनतेवर लादणे कदापि सहन करणार नाही. हा कर रद्द करणेच शहाणपणाचे ठरेल,असा इशारा देत वित्त खात्याचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आणू, असे पर्रीकर म्हणाले.
आरोग्य व कृषी खात्यात ज्या भानगडी सुरू आहेत त्याही सभागृहासमोर आणल्या जातील. या खात्याचे मंत्री नवीन असल्याने भाजपने दोन वर्षे कळ काढली. मात्र या खात्यांचा कारभार पाहिल्यास हे मंत्री शिरजोर झाल्याचे दिसून येते. या दोन्ही खात्यांतील गैरव्यवहारांचा लेखाजोगाच सभागृहासमोर मांडला जाईल, असेही पर्रीकरांनी सांगितले.

No comments: