Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 30 November, 2009

उसगाव सरपंच, पंच यांना ग्रामस्थांकडून धक्काबुक्की

शौचालयांच्या बांधकामाबद्दल उडवाउडवीची उत्तरे
ग्रामसभांमध्ये प्रचंड गदारोळ

तिस्क उसगाव, दि.२९ (प्रतिनिधी) - घाटवाडा तिस्क उसगाव येथील एका आस्थापनाच्या आवारात सुरू असलेल्या शौचालयांच्या बांधकामावर उसगाव पंचायत मंडळाने काहीच कार्यवाही न केल्याने आज सकाळी उसगावच्या ग्रामसभेत ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. सरपंचांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने ग्रामस्थ अधिकच खवळले. यावेळी सरपंच सौ. उत्कर्षा चोडणकर, पंच सदस्य रामनाथ डांगी यांना धक्काबुक्की करण्यात आली. गोंधळाच्या वातावरणात ग्रामसभा संपली आणि नंतर फोंडा पोलिस पंचायत सभागृहात दाखल झाले.
या सभेला पोलिस संरक्षण न दिल्याने सत्तारूढ गटातील पंचांनी नाराजी व्यक्त केली. धक्काबुक्कीसंदर्भात उसगाव सरपंचांनी फोंडा पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. मात्र त्यात कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही.
सकाळी १०.३० वाजता ग्रामसभा पंचायत सभागृहात सुरू झाली. सरपंच सौ. उत्कर्षा चोडणकर यांनी स्वागत केले. त्यानंतर काही ग्रामस्थ उभे राहिले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मागील ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे ग्रामसभा का घेतली नाही, ग्रामसभा घेण्यासाठी फोंड्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना आदेश का द्यावा लागला, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावेळी सरपंचांनी नव्यानेच पद स्वीकारल्याने ग्रामसभा घेण्यात आली नाही, असे उत्तर पंच रामनाथ डांगी यांनी देताच ग्रामस्थ संतापले. ग्रामसभा घेण्यासाठी सरपंचांची गरज नाही, पंचायत राज कायद्यानुसार येथे ग्रामसभा घेतल्या जात नाहीत, असे ग्रामस्थ म्हणाले.
घाटवाडा उसगाव येथील देवयानी फूडस् प्रॉडक्ट प्रा.ली. या आस्थापनात स्थानिक युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत मंडळाने आजपर्यत काय केले? तेथे काम करणाऱ्या सात स्थानिकांना देवयानी
आस्थापनाने त्वरित सामावून घेतले पाहिजे. त्यासाठी पंचांना लोकांसोबत यावे लागेल, असे ग्रामस्थांनी बजावले. देवयानी या आस्थापनाच्या व्यवस्थापकांना सात दिवसांत पंचायत कार्यालयात बोलावून घेण्यात येईल. तसेच या आस्थापनात काम केलेल्या व सध्या बेरोजगार असलेल्या सात जणांनाही पाचारण करून याप्रश्नी तोडगा काढला जाईल, असे आश्वासन पंच रत्नाकर परब फात्रेकर यांनी दिले. खनिज माल वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उसगाव पंचायतीने पुढाकार घ्यावा, असा ठराव आधीच्या ग्रामसभेत संमत झाला होता. अद्याप त्यासंदर्भात उसगाव पंचायतीने काहीच कार्यवाही न केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. यासंदर्भात २५ नोव्हेंबर रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांशी बोलणी झाली होती. वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिस याबाबत दर आठवड्याचा अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत, असा खुलासा रामनाथ डांगी यांनी केला. ट्रक मालक संघटनेचा यावेळी उल्लेख झाला. त्यामुळे ट्रक मालक ग्रामस्थ संतापले. ट्रक मालक संघटनेला फलक लावण्यास सरपंच सौ.चोडणकर व पंच डांगी यांनी विरोध केला. मात्र आरोग्यमंत्र्यांचे फलक कोणाचीही परवानगी घेतल्याशिवाय लावले जातात. त्यांना कायदाचे बंधन नाही काय, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.
गावातील सामाजिक समस्या सोडविण्यास पंचायत मंडळ पुढाकार घेत नाही. गावातील बेरोजगार युवकांना रोजगार संघी उपलब्ध करून देत नाही. केवळ आपला आर्थिक स्वार्थ पाहिला जातो, असे आरोप ग्रामस्थांनी केले. सर्व टिपर ट्रकांना खनिज माल वाहतूक करता येते. मार्गावरील खनिज वाहतूक पंचायत बंद करू शकत नाही. खनिज मालवाहू टिपर ट्रकांची संख्या वाढल्याने रस्त्यावरील धूळ झाडता येत नाही, असे पंच सदस्य रत्नाकर परब फात्रेकर म्हणाले. सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत खनिज वाहतूक बंद ठेवण्याची मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली.
म्हारवासडा उसगाव येथील एका लोह प्रकल्पावर पंचायत मंडळ काहीच कारवाई करीत नाही. या प्रकल्पाच्या बॉयलरचे गरम उकळते पाणी रस्त्यावर सांडून अनेक दुचाकीस्वारांना अपघात घडले आहेत. या पाण्यामुळे गंभीर स्वरूपाचा अपघात घडण्यापूर्वी सदर आस्थापनावर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
घाटवाडा उसगाव येथील एका आस्थापनातर्फे सुरू असलेल्या शौचालयाच्या बांधकामावर पंचायत मंडळ काहीच कारवाई करीत नाही. तसेच पंचायतीकडून खोटी माहिती पुरवली जाते, असे समजताच त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.पंचायत राज कायद्याची कलमे यावेळी वाचून दाखवण्यात आली. सदर आस्थापानाचे बांधकाम कायदेशीर असल्याचा निर्वाळा सरपंचांनी देताच गोंधळ निर्माण झाला. सरपंच सौ. चोडणकर व पंच सदस्य रामनाथ डांगी यांच्यावर लोक धावून गेले. त्यावेळी पंचायत सचिव गजानन नाईक यांनी कडे करून त्यांना वाचविले. संबंधित आस्थापनाने शौचालयांचे बांधकाम सुरू केले आहे.
तेथील सांडपाणी ओपा नदीत सोडण्याची तयारी सुरू झाली आहे. या प्रकल्पाचे पाणी गोव्यातील जनतेला पुरविले जाते. या शौचालयातील सांडपाण्यामुळे
नदीचे पाणी प्रदूषित होणार असून ते लोकांच्या आरोग्यंास अपाय संभवतो, अशी कैफियत ग्रामस्थांनी मांडली.
एका पंचाने तर तिस्क उसगाव येथे स्थायिक झालेल्या बिगर गोमंतकीय लोकांची आडनावे बदलून ती "नाईक' अशी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.स्थानिक युवकांना डावलून बिगर गोमंतकीयांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या जातात, असा दावाही ग्रामस्थांनी केला. यावेळी राजीव आवास योजनेसंदर्भात पालवाडा भागातील २० ग्रामस्थांची नावे पंचायत सचिवांनी वाचून दाखविली.
पंच सदस्य ज्ञानेश्वर नाईक हे सामाजिक हित पाहतात. ग्रामस्थांना ते नेहमी सहकार्य करीत असतात. पंचायतीत काय चालले आहे.याची माहिती ग्रामस्थांना देतात. म्हणून अन्य एका पंचाने त्यांना धमकी दिल्याची माहिती सभेत देण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांचा पारा चढला. त्यांनी सरपंच व अन्य एका पंचाला धक्काबुक्की केली. त्यामुळे गोंधळ माजला व पंच सदस्यांना तेथून पळावे लागले.धक्काबुक्कीची घटना संपून शांतता निर्माण झाल्यावर फोंडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या सभेसाठी पोलिस बंदोबस्त मागितला होता. तो देण्यात आला नाही, अशी माहिती पंच रत्नाकर परब फात्रेकर यांनी दिली. सरपंचांनी धक्काबुक्कीप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. मात्र त्यात कोणाचाही नामोल्लेख केलेला नाही.
या सभेला सरपंच सौ. उत्कर्षा चोडणकर, उपसरपंच कांती गावडे. पंच सदस्य सौ. प्रगती गावडे, मनोहर गावडे, रत्नाकर परब फात्रेकर, रामनाथ डांगी, ज्ञानेश्वर नाईक उपस्थित होते. फोंडा गटविकास कार्यालयातील नमीता वेरेकर या सभेच्या पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होत्या. अहवाल वाचन पंचायत सचिव गजानन नाईक यांनी केले. सभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments: