Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 30 November, 2009

खोर्जुवेचे "ते' बांधकाम न पाडल्यास गंभीर परिणाम

हळदोणे ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक

म्हापसा, दि. २९ (प्रतिनिधी) - हळदोणे ग्रामसभेत आज खोर्जुवे येथील ग्रामस्थांनी एका बेकायदा बांधकामाबाबत आक्रमक भूमिका घेत, हे बांधकाम एका महिन्यात पाडण्यात येईल,असे आश्वासन पंचायतीकडून मिळवले आणि या मुदतीत कारवाई न झाल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा पंचायतीला दिला. आज सकाळी ग्रामसभा सुरू होताच, सखाराम नागवेकर व इतरांनी कोळम खोर्जुवे येथे लोन रेडर्स रिसॉर्ट ऍन्ड ट्ूर्स कंपनीच्या बांधकामाबाबत दिलेल्या निवेदनावर स्पष्टीकरण मागितले असता, हा मुद्दा मागच्या ग्रामसभेत उपस्थित झाला, त्यावेळी उत्तर दिलेले असल्याने पुन्हा त्याच प्रश्नावर चर्चा नको,असे सरपंच दिलीप हळदणकर यांनी सांगितल्यावर उपस्थित ग्रामस्थ खवळले. हे बांधकाम एका अभिनेत्याचे असून एका आमदाराच्या दडपणाने पंंचायत पक्षपातीपणाने वागत आहे,अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती.
स्व. बाबुराव भोसले यांच्या जागेत फार्महाऊस बांधण्यास कोणी परवानगी दिली, नगरनियोजन खात्याने सीआरझेड कक्षेत येणाऱ्या या जागेत कोणतेही बांधकाम उभे राहू शकत नसल्याचे पंचायतीला कळवूनही हे बेकायदा बांधकाम पंचायत कसे काय "कायदेशीर' करु शकते. यापूर्वी पंचायतीने हे बांधकाम पाडण्याची नोटीस दिली होती, त्याचे काय झाले,असा प्रश्नांंचा भडिमार उपस्थितांनी केला. सरपंच यावर काहीच उत्तर देऊ न शकल्याने सचिवांनी याबाबत स्पष्टीकरण करावे, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला. सचिवांनाही याबाबत काहीच सांगता आले नाही.
सुमारे ५० शेतकऱ्यांची पायवाट अडवून आणि गणेश विसर्जनाचा मार्ग रोखून होणारे बेकायदा बांधकाम पाडण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम राहिले. जुन्या घराचा क्रमांक कायम ठेवून दुरुस्ती करण्यात येत असल्याची बतावणी करीत नव्या बांधकामाला पंचायतीने कशी काय परवानगी दिली आणि आता कोणत्या फार्महाऊसला कायदेशीर ठरविले जात आहे,असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले. खुर्साचा मांड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागेत धार्मिक विधी होत असत, ती जागा आता बांधकामासाठी अडविली गेली आहे, शेतात ट्रॅक्टर, नांगर नेण्यासाठी याच पायवाटेचा उपयोग गेली अनेक वर्षे केला जात आहे. आता पंचायतीने धार्मिक विधीसाठी पुरेशी जागा सोडावी आणि पायवाट मोकळी करावी,अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. पंचायतीने या मागणीची दखल घ्यावी आणि तशी नोंद करावी,असेही ग्रामस्थांनी पंचायतीला बजावले.
ग्रामसभेला सरपंचाव्यतिरिक्त उपसरपंच रोझी लोबो, अन्य पंच , सचिव फातर्पेकर, गट विकास कार्यालयाचे अधिकारी श्री. पागी उपस्थित होते.

No comments: