Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 30 November, 2009

कैगा अणुप्रकल्पातील घटना हा घातपाताचा प्रकार शक्य

दोषींवर कडक कारवाईः काकोडकर

किरणोत्सर्ग पाण्यातून
संसर्गाने ५५ जण आजारी


बंगलोर, दि. २९ - कर्नाटकच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यात असलेल्या कैगा येथील अणुप्रकल्पात किरणोत्सर्ग झाला असून अणुऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येणारे जड पाणी एका कूलरमधील पिण्याच्या पाण्यात मिसळल्यामुळे ५५ लोक आजारी पडले आहेत. अणुप्रकल्पात किरणोत्सर्गाची ही घटना घातपात असल्याची शक्यता अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर दोषींना कठोर शासन केले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
या किरणोत्सर्गामुळे आजारी पडलेल्यांना मल्लापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून किरणोत्सर्ग रोखण्यात आल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या कूलरमध्ये जड पाणी कसे मिसळले याची चौकशी सुरू आहे. किरणोत्सर्ग थांबविण्यात यश आले असल्याचीही पुष्टी झाली आहे. ज्या ठिकाणी किरणोत्सर्ग झाला तो संपूर्ण परिसर, किरणोत्सर्ग झालेले पाणी आणि कूलर विशिष्ट प्रकारे सील करण्यात आले असून तज्ज्ञांमाफत त्याची तपासणी केली जात आहे.
अणुऊर्जेची निर्मिती जिथे करण्यात येते त्या मुख्य यंत्रणेपासून दूर असलेल्या कूलरमध्ये जड पाणी मिसळण्यामागे काही घातपात आहे का, या प्रश्नावर प्रशासनाने कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. पण, या प्रकाराचा देशाच्या अणुऊर्जा निर्मिती योजनांवर काहीही परिणाम होणार नाही, असे आश्वस्त केले आहे.
कैगा हा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प मार्च २००० पासून कार्यरत आहे. हा प्रकल्प न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने चालविला जातो. या ठिकाणी प्रथमच किरणोत्सर्गाचा प्रकार घडला आहे.

घातपाताची शक्यता : काकोडकर
कैगा अणुऊर्जा प्रकल्पात झालेला किरणोत्सर्ग हा घातपाताचा प्रक़ार असल्याचा संशय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला आहे.
कोणीतरी जाणीवपूर्वक किरणोत्सर्ग पसरविणारे ट्रिटीयममिश्रीत जड पाणी कूलरच्या पाण्यात मिसळले असल्याचे काकोडकर यांचे म्हणणे आहे. जड पाणी, ट्रिटीयम हे सगळे घटक विशिष्ट पाईपलाईनच्या माध्यमातून अणुऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या मुख्य प्रकल्पापर्यंत पोहोचतात. ते सुट्या स्वरूपात अणुभट्टीच्या आवारात कुठेच ठेवता येत नाहीत. त्यामुळे किरणोत्सर्ग करण्याची क्षमता असलेले घटक पिण्याच्या पाण्यात मिसळण्याचे काम प्रकल्पाच्या बदनामीसाठी मुद्दाम करण्यात आल्याचा संशय काकोडकर यांनी व्यक्त केला आहे.
ज्या कूलरमध्ये किरणोत्सर्ग झाला आहे तो कूलर कैगा प्रकल्पाच्या बाहेरच्या आवारात मोकळ्या मैदानात आहे. तिथे काम करणारे ऊर्जानिर्मितीचे मुख्य काम चालते त्या परिसरात जातच नाीत, अशी माहितीही त्यांनी दिली. हा प्रकार घडला असला तरी तेथील स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असा आश्वासक दिलासाही अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांनी दिला आहे.

No comments: