Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 15 July, 2009

दाबोळीत पक्षी आदळूनही विमान सुखरूप उतरवले

अर्धा तास वाहतूक ठप्प
वास्को, दि. १४ (प्रतिनिधी): दाबोळी विमानतळावर १७० प्रवाशांना घेऊन उतरत असलेल्या "स्पाइस जेट'च्या विमानाला पक्षी आदळल्याने उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्धा तास धावपट्टीवर अडथळा निर्माण झाला. दाबोळी विमानतळावर क्षेत्रात घडलेल्या या घटनेमुळे सदर विमानाच्या प्रवाशांबरोबरच येथे उतरणाऱ्या अन्य ७ विमानांच्या प्रवाशांनाही याचा त्रास सोसावा लागला.
आज दुपारी १.२० च्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईमार्गे गोव्यात येणाऱ्या "एसजी ८०३ स्पाइस जेट' या विमानाला दाबोळी विमानतळावर उतरत असताना पक्षी आदळल्याची माहिती मिळताच विमानतळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले. १७० प्रवासी असलेल्या या विमानात तांत्रिक बिघाड निर्माण होत असल्याचे समजताच वैमानिकाने विमान सुखरूपपणे दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर उतरवले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे धावपट्टीवरच बंद पडले. विमान बंद पडल्याने येथे उतरणाऱ्या अन्य ७ विमानांना याचा फटका बसला. या सातही विमानांना सुमारे अर्धा तास उंच आकाशात विमान स्थिर ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती विमानतळावरील सूत्रांनी दिली. या विमानांमधून प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांनाही याचा काही प्रमाणात त्रास झाला. यानंतर "स्पाइस जेट'चे तांत्रिक येथे दाखल झाले आणि नौदलाच्या मदतीने धावपट्टीवर अडथळा निर्माण करणाऱ्या विमानाला येथून हटवले गेले. सुमारे अर्धा तास दाबोळी विमानतळावरील बंद पडलेली विमानसेवा यानंतर सुरळीत झाली.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी दाबोळी विमानतळावरील सूत्रांशी संपर्क साधला असता पक्षी आदळल्याने निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमान बंद पडल्याचे त्यांनी सांगितले. येथे प्रवाशांना उतरवून पुन्हा १.४० च्या दरम्यान हे विमान अहमदाबादला जाणार होते मात्र बिघाडामुळे या विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाद्वारे पोचवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर दिल्ली येथून आलेल्या अन्य एका स्पाइस जेट विमानाला पक्षी आदळल्याचा संशय असल्याचे त्याचीही तपासणी करण्यात आली. यावेळी काहीही सापडले नसल्याने त्या विमानाला उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती विमातळावरील सूत्रांनी दिली. दरम्यान, आज दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विमानतळावरील वाहतुकीवर कोणताच परिणाम झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
-----------------------------------------------------------
विमानतळ परिसरातील कचऱ्यामुळे पक्ष्यांचे थवे
गेल्या काही काळापासून दाबोळी विमानतळावरून ये-जा करणाऱ्या विमानांना पक्षी आदळत असतानाही प्रशासनाने विशेष उपाययोजना केलेल्या नाहीत. दाबोळी विमानतळाबाहेर असलेल्या चिखली पंचायतीच्या हद्दीत रेल्वे रुळांजवळ काही अज्ञातांकडून गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. यामुळे येथे विविध प्रकारच्या पक्ष्यांचे थवे खाण मिळण्याच्या आशेने गर्दी करतात. हे पक्षी मोठ्या प्रमाणात विमानतळाच्या धावपट्टीच्या हद्दीत प्रवेश करताना स्पष्टपणे दिसून येतात.
दाबोळी विमानतळावरील अनेक विमानांना पक्ष्यांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. तसेच विमानसेवेवरही याचा परिणाम झाला आहे. एखादी गंभीर घटना घडल्यास याला कोण जबाबदार असेल? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. विमानतळाच्या परिसरात टाकण्यात येणारा कचरा व येथे येणाऱ्या पक्ष्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधितांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी येथून होत आहे.

No comments: