Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 February, 2009

कर्नाटकात कोकणी लागू करण्याचे वचन

अ. भा. कोकणी संमेलनाचा थाटात समारोप
संतोष गावकर
कुंदापूर, दि.८ - कर्नाटकात कोकणी विषय लागू करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. व्ही. एम. आचार्य यांनी आज संध्याकाळी १९ व्या अखिल भारतीय कोकणी संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कुंदापूर येथे बोलताना दिले. यावेळी व्यासपीठावर राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक, गोवा कोकणी अकादमीचे एन. शिवदास, संमेलनाध्यक्ष रमेश वेळुस्कर, गोकुळदास प्रभू, सदानंद काणेकर, उपस्थित होते. ज्ञानपीठ विजेते रवींद्र केळेकर यांच्यावर कर्नाटक राज्यात शैक्षणिक अभ्यासक्रमात एक पाठ असावा ही साहित्य संमेलनाने केलेली मागणी पूर्ण करण्याचे आश्वासनही डॉ. आचार्य यांनी दिले.
१९ व्या अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी कुंदापूर येथे उद्योजक दयानंद पै यांच्या हस्ते झाले. त्यावेळी व्यासपीठावर राज्यसभा खासदार शांताराम नाईक, विधान परिषदेचे सदस्य श्रीनिवास पुजारी, कार्याध्यक्ष गोकुळदास प्रभू, संमेलनाचे अध्यक्ष रमेश वेळुस्कर, सदानंद काणेकर, फा. आल्बन डिसोझा उपस्थित होते. त्यापूर्वी संमेलनस्थळ ते व्यंकटरमण देवालय व परत अशी शोभायात्रा संमेलन सुरू होण्यापूर्वी काढण्यात आली.
यानंतर वेळुस्कर, खासदार नाईख, फा. डिसोझा, पै, पुजारी यांची भाषणे झाली. उद्घाटन कार्यक्रमात कोकणी भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम केलेल्या संस्थांचा व व्यक्तींना गौरवण्यात आले. त्यात अशोक कामत,. कर्नाटकातील उद्योजक दयानंद पै, फादर फ्रान्सिस्को फर्नांडिस, डॉ. शांताराम यांचा समावेश होता. गोव्यातून गेलेले लेखक तसेच कोकणीप्रेमी संमेलन संपल्यावर रेल्वे व खाजगी वाहनाने रात्री गोव्यात परतले.

No comments: