Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 10 February, 2009

डोंगरीतील संभाव्य कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - बायंगिणी जुने-गोवा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विविध कारणांस्तव प्रखर विरोध झाल्यानंतर, सरकारने पर्यायी जागा म्हणून मंडूर-डोंगरीची निवड केल्यानंतर आजोशी, मंडूर, डोंगरी, नेवरा भागातील गावकऱ्यांनी काल मंडूर-तिठो येथे तातडीने सार्वजनिक सभा घेऊन या प्रकल्पास जोरदार विरोध करण्याचे ठरवले.
या बैठकीस स्थानिक आमदार फ्रान्सिस सिल्वेरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आजोशी-मंडूरचे सरपंच राजेश मयेकर होते. व्यासपीठावरील मान्यवरांमध्ये उपसरपंच पावलिन पो, पंच श्री. मडकईकर, समीर नाईक, ऍना रॉड्रिगीस, सामाजिक कार्यकर्ते विठू मार्वेकर, मंडूर चर्चचे फादर दोरादो यांच्या समावेश होता.
या सभेत तुळशीदास गावडे, विवेक मयेकर, श्याम गावडे, विठू नार्वेकर, पावलिन पो, सरपंच राजेश मयेकर, संदीप वेर्णेकर, श्री. रॉड्रिगीस, पीटर वाझ व फ्रान्सिस सिल्वेरा यांची सदर कचरा प्रकल्पाला विरोध करणारी भाषणे झाली.
या वक्त्यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प, सरकारी धोरण, प्रकल्पासाठी डोंगरी गावची पर्यायी निवड करण्यामागची सरकारची मानसिकता, प्रकल्पाचे दूरगामी दुष्परिणाम व प्रकल्पाविरोधातील डोंगरी गावची भूमिका यावर भर दिला. कचरा प्रकल्पाविरोधातील लढा हा आपल्या डोंगरी गावावर आलेले संकट असून ते दूर करण्यासाठी जीवाची बाजी लावून लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
आमदार सिल्वेरा म्हणाले, आपण सदोदित सांत आंद्रे मतदारसंघातील जनतेच्या पाठीशी असून लोकांना हवे तेच होईल. त्यांच्यावर कोणतीही गोष्ट लादली जाणार नाही. सांत आंद्रे मतदारसंघातील कुडका येथे हा प्रकल्प लादण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी झाला होता. त्याची बाधा कुडकावासीयांना झाल्यानंतर तो प्रकल्प आपण तेथून हटवण्याकामी यशस्वी झालो. अर्थात, यासाठी कुडकावासीयांनी आपल्याला सहकार्य दिले.
तशाच सहकार्याची अपेक्षा आपण यावेळी डोंगरीवासीयांकडून करतो, असेही ते म्हणाले. त्यांनी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात योग्य ती चर्चा करण्यासाठी गावकऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ घेऊन जाण्याचे आश्वासनही उपस्थितांना दिले.
उपस्थित गावकऱ्यांनी आपल्या गावावर येऊ घातलेल्या संकटाचा सामना करताना या कचरा प्रकल्पविरोधी लढ्यात आमदार सिल्वेरा यांना साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments: