Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 February, 2009

खुल्या अधिवेशनात मान्यवरांचा सत्कार

मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

माशेल, दि. ८ (प्रतिनिधी) - गेले दोन दिवस माशेल येथील देवकीकृष्ण मैदानावर उभारलेल्या भव्य बा. द. सातोस्कर नगरांत उत्कृष्ट आयोजनासाठी कौतुक झालेल्या गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या २७ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचा सुरेख समारोप करण्यात आला.
समारोपाच्या खुल्या अधिवेशनात ज्येष्ठ तबलापटू तुळशीदास नावेलकर (माशेल), प्रसिद्ध चित्रकार दयानंद भगत (खांडोळा), वाचक चळवळीचे अर्धव्यू श्रीधर खानोलकर (फोंडा), साहित्य संगम संस्थेचे गजानन मांद्रेकर (मांद्रे) व नीलेश शिरोडकर (करमळी) यांचा संमेलनाध्यक्ष पु. शि. नार्वेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष ऍड. विनायक नार्वेकर यांनी संमेलनाच्या दोन्ही दिवसांचा आढावा घेतला यावेळी चार ठराव टाळ्यांच्या कडकडाटात संमत करण्यात आले. त्यात मराठी गोव्याची राजभाषा करावी, गोमंतक साहित्य सेवक मंडळाने मार्गदर्शक संस्था म्हणून भूमिका बजावून येत्या दोन वर्षात आणखी वीस नवीन मराठी संस्थांची नोंदणी करावी आणि शिक्षकांअभावी बंद पडत चाललेल्या शाळा सुरू राहाव्यात यासाठी तातडीने शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी असे ठराव संमत करण्यात आले.
तत्पूर्वी सकाळी झालेल्या "नवे सुर अन् नवे तराळे' या युवा पिढीसाठी आयोजित कार्यक्रमांत तृप्ती केरकर (धेंपे महाविद्यालय) शुभदा चिंचवडेकर (खांडोळा महाविद्यालय), वैष्णवी हेगडे (धेंपे) केदार तोटेकर (पी. ई. एस. महाविद्यालय), कौस्तुभ नाईक (चौगुले) चिन्मय घैसास(पी. ई. एस्) यांनी भाग घेतला. यावेळी झालेल्या वार्तालापात, युवा पिढीसाठी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी ""वुई आर नॉट युझलेस, बट वुई आर युझ्ड लेस' असा सूर व्यक्त केला. संवादक संगीता अभ्यंकर व रवींद्र पवार यांनी, आजची तरुण पिढी देशाचे भविष्य असून त्यांच्यावर जबाबदारी सोपविल्यास,ती पूर्ण कसोटीला उतरेल, असे सांगितले.
या वार्तालापाचा शेवट करताना, प्रा. यशवंत पाठक यांनी व्यासपीठावर उपस्थित सहाही युवकांनी आपण श्रीमंत व्हावे, या जागतिक तत्त्वज्ञ बनावे असे व्यक्त केले नसले तरी त्यांना चांगले काम करून पुढे जायचे आहे असे दिसते, त्यासाठी त्यांनी भरपूर वाचन करावे, ज्ञान मिळवावे आणि जेव्हा मोठ्या माणसाच्या सावल्या खुज्या होतात व हिमालय जेव्हा टेकडीसारखा वाटतो, तेव्हा संस्कृतीचा ऱ्हास होतो हे लक्षात ठेवावे असे आवाहन केले.
त्यानंतर विनोदी शैलीत "निसर्गसाधक' पक्षी शास्त्रज्ञ मारुती चितमपल्ली यांची प्रा. विनय बापट व प्रा. सुमेधा कामत देसाई यांनी प्रकट मुलाखत घेतली.
"वाङ्मयीन पुरस्कार समज/गैरसमज' हा परिसंवाद अपेक्षेप्रमाणे रंगला नाही तरी सहभागी डॉ. सचिन कांदोळकर, डॉ. विद्या प्रभू देसाई, ऍड. दौलत मुतकेकर व प्रा. ललिता जोशी यांनी तसेच अध्यक्ष प्रा. रवींद्र घवी यांनी पुरस्कारप्राप्त पुस्तकांच्या आवृत्तीवर आवृत्ती निघायला हव्यात पण ते आज गोमंतकात होत नाही. लेखक दुसऱ्याच्या डोळ्यांनी लेखन - पुस्तक वाचू शकत नाही कारण आजच्या समीक्षकांना पुस्तके वाचायला वेळ मिळत नाही, ते आपल्या लेखनिकांवर वाचनाची जबाबदारी सोपवून, अभिप्राय मागवतात हे बरोबर नाही. काही लेखक गोपनीयतेने माहिती मागून घेतात. यात कधीकधी व्यक्तिनिष्ठ, व्यक्तिगत संबंध तसेच प्रादेशिकता आडवी येते. गोमंतकीय साहित्य गोमंतकाच्या सीमा ओलांडून बाहेर जात नसल्यामुळे गोमंतकीय लेखकांना पुरस्कारांची माहितीही नसते,असा सूर व्यक्त केला.
संमेलनाच्या समारोपाच्या समारंभात, साहित्य दिंडीत सहभागी झालेल्या, शाळेतील मुलांच्या आयोजित वेशभूषा स्पर्धेत अखिलेश संदीप नावेलकर (माशेल) प्रथम, देवश देवेंद्र जल्मी (तारीवाडा) द्वितीय, प्रदोन प्रदीप नाईक (भोम) यांना तृतीय तर कुमार देवधर (माशेल) व वेदांत संजय प्रभू गांवकर (तारीवाडा) यांना उत्तेजनार्थ बक्षिसे संमेलनाध्यक्ष पु. शि. नार्वेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
संमेलनाच्या दोन दिवसांत झालेल्या कार्यक्रमांबद्दल, वैष्णवी हेगडे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. संमेलनाध्यक्ष पु. शि. नार्वेकर, स्वागताध्यक्ष डॉ. विठ्ठल ठाकूर व गोमंतक साहित्य सेवक मंडळाध्यक्ष सुरेश स. नाईक यांनी यावेळी समारोपाची भाषणे केली. प्रमुख कार्यवाह प्रेमानंद नाईक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. पसायदानाने संमेलनाची सांगता करण्यात आली,
यानंतर भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे या संस्थेने, संगीत "कट्यार काळजात घुसली' या नाटकाचा सुंदर प्रयोग सादर केला.

No comments: